पनवेल : नवीन पनवेल आणि खारघर येथील डायलिसिस केंद्रे जानेवारी महिन्यात सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. ‘लोकसत्ता’ने १८ सप्टेंबरला ही केंद्रे रखडल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल प्रशासनाने घेतली असून या केंद्रांच्या कामाला यामुळे गती मिळाली आहे.

अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह दोन्ही केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रलंबित कामे आणि रुग्णांसाठी आवश्यक सुविधांचा आढावा घेतला. उदवाहक, वातानुकूलन यंत्रणा, विद्युत व्यवस्था आणि वैद्यकीय प्राणवायू वाहिनीची कामे पूर्ण करून महासभेची मंजुरी व निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर पुढील चार महिन्यांत केंद्रे कार्यान्वित करण्याचे महापालिकेचे नियोजन असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या केंद्रातून प्रत्यक्ष सुविधा मिळविण्यासाठी अजून चार महिन्यांची प्रतीक्षा रुग्णांना करावी लागणार आहे.

दोन्ही केंद्रांमध्ये वैद्यकीय प्राणवायू वाहिनीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. खारघर केंद्रासाठी वाहिनीचा पुरवठा, बसविणे, चाचणी, कार्यान्वयन आणि देखभालीसाठी १ कोटी ५८ लाख ४७ हजार ४६७ रुपये, तर नवीन पनवेल केंद्रासाठी १ कोटी ६० लाख २९ हजार ३७७ रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे.

या केंद्रांमध्ये आयसीयू दर्जाच्या सुविधा आणि आधुनिक डायलिसिस मशीन उपलब्ध असतील. प्रत्येक केंद्रात तीन शिफ्टमध्ये दररोज १०० रुग्णांवर उपचार करता येतील. दोन्ही केंद्रांतून दररोज २००, तर आठवड्यात सुमारे ६०० रुग्णांना तीन वेळा मोफत डायलिसिस सेवा मिळू शकेल. त्यामुळे रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी होण्याची अपेक्षा आहे.प्रत्येक केंद्रातील २५ खाटांपैकी पाच खाटा हेपेटायटिस बी, सी आणि एचआयव्हीग्रस्त रुग्णांसाठी, दोन खाटा गर्भवती महिला व बालकांसाठी आणि दोन खाटा महापालिकेच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील. तज्ज्ञ नेफ्रॉलॉजिस्ट, डायलिसिस डॉक्टर, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि परिचारिका पूर्णवेळ कार्यरत असतील. उपचारादरम्यान प्रकृती गंभीर झाल्यास रुग्णाला महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय पथकाकडून पुढील उपचारांचा पाठपुरावा केला जाणार आहे.

महापौर नितीन पाटील यांनी प्रकल्पाला होणारा विलंब लक्षात घेऊन पाहणी करून कामाला गती देण्याच्या सूचना केल्या होत्या. खासदार श्रीरंग आप्पाबारणे यांनीही प्रशासकीय प्रक्रियेला झालेल्या विलंबाकडे लक्ष वेधले आहे. विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी कार्यादेश दिल्यानंतरही काम वेळेत पूर्ण होत नसल्याने प्रशासनाने प्रकल्पांना गती देण्याची गरज व्यक्त केली आहे.

पनवेलकरांसाठी डायलिसिस केंद्रे सुरू करण्याबाबत महापालिका प्रशासन गंभीर असून, दोन्ही केंद्रांमध्ये डायलिसिससाठी लागणाऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रांसह उदवाहक, विद्युत यंत्रणेतील सुधारणा आणि वातानुकूलित यंत्रणा अशा आवश्यक सुसज्ज बदलांसाठी महासभेची मंजुरी व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील चार महिन्यांत ही कामे पूर्ण करून जानेवारीमध्ये केंद्रे सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. – मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका

केंद्रांचा खर्च
खारघर सेक्टर ३६ येथील केंद्राचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, त्यासाठी १ कोटी ८५ लाख ३० हजार ६६९ रुपये खर्च अपेक्षित आहे.नवीन पनवेल केंद्राचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून, त्यासाठी १ कोटी ७० लाख ७४ हजार ४९१ रुपये खर्च अपेक्षित आहे.