पनवेल – पनवेल परिसरातून उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेत कराड ते खारघर असा प्रवास करणाऱ्या एका सोनाराचे तब्बल एक कोटी १४ लाख रुपयांचे सोने चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करत असताना ही चोरी झाल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबईतील भायखळा येथील श्री नाकोडा हाईट्स या इमारतीमध्ये राहणाऱ्या ६४ वर्षीय सराफ व्यावसायिकाने याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना २० फेब्रुवारी रोजी पहाटे घडली. तक्रारीनुसार, संबंधित सराफ सातारा जिल्ह्यातील कराड येथून दुर्गाम्बा ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने (शिमोगा ते मुंबईकडे) प्रवास करत होते. २० फेब्रुवारीच्या रात्री सुमारे अडीच वाजता त्यांनी बसमध्ये प्रवेश केला.
प्रवासादरम्यान खारघर येथील बसथांब्याजवळ बस पोहोचल्यानंतर सराफांना आपली बॅग जवळ नसल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ बसमध्ये बॅग ठेवलेल्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली, मात्र बॅग सापडली नाही. त्यानंतर त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, चोरीस गेलेल्या बॅगमध्ये ६०० ग्रॅम वजनाच्या ८० टक्के शुद्ध सोन्याच्या लगडी, १४.५०० ग्रॅम, ३३८.८२० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लगडी तसेच ६० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण एक कोटी १४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल होता.या प्रकरणाचा तपास खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
बस कोणकोणत्या ठिकाणी थांबली, त्या वेळी कोणते प्रवासी उतरले, याची सविस्तर माहिती घेतली जात आहे. यापूर्वीही कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी बसमधून प्रवाशांच्या बॅग चोरीच्या अनेक घटना घडल्या. काही काळानंतर पोलिसांनी चोरट्याला व त्याच्या सहका-यांना पकडले. मात्र पुन्हा अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. या घटनेमुळे खासगी ट्रॅव्हल्समधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.

