पनवेल : खारघर येथील झेरॉक्स दुकानात पनवेल विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल तपासणी (एसआयआर) प्रक्रियेतील प्रगणक पत्रांचे गठ्ठे आढळल्याप्रकरणी रायगड जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. संबंधित अर्ज अनधिकृतपणे बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अर्ज दुकानात आढळण्यास कारणीभूत ठरलेल्या संबंधित बीएलओंना निलंबित करण्यात आल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शुक्रवारी दिली. मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान गुरुवारी खारघर सेक्टर १९ मधील एका झेरॉक्स दुकानात पनवेल विधानसभा मतदारसंघातील अन्य भागांतील एसआयआर अर्ज आढळल्याने राजकीय वाद निर्माण झाला होता.

सर्वसामान्य मतदारांनी भरून दिलेले हे अर्ज खासगी व्यक्तींकडे कसे पोहोचले, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी अॅड. बालेश भोजने यांनी उपस्थित केला होता. या प्रकरणात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला होता. खारघर पोलिसांनी या प्रकरणी गुरूवारी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविला नसल्याने शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनीही या प्रकरणी राज्याच्या निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली होती.  मात्र, या प्रकरणाशी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कोणताही संबंध नसल्याचा दावा पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी केला होता.

एसआयआर मोहिमेत सर्वच राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य केले असून मतदार नोंदणीची माहिती विविध राजकीय पक्षांकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. संबंधित अर्ज सध्या प्रत्यक्ष पडताळणीच्या कामासाठी बीएलओंना आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले होते. पनवेल विधानसभा मतदारसंघात सुमारे ६ लाख ८४ हजार मतदार असून, त्यापैकी सुमारे ४ लाख ३९५ मतदारांची एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सुमारे २ लाख ८३ हजार मतदारांचा अद्याप शोध लागलेला नाही. महसूल विभागामार्फत ही प्रक्रिया सुरू असून, ३१ ऑगस्टनंतर प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शुक्रवारी पनवेल येथील उप विभागीय अधिकारी पवन चांडक यांचे कार्यालय गाठले.

जिल्हाधिकारी जावळे यांनी या संपुर्ण प्रकरणाबाबत मतदारांना एका ध्वनीचित्रफितीद्वारे या प्रकरणातील प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. खारघर येथील सेक्टर १९ येथील एका झेरॉक्स सेंटरमध्ये एसआयआर अर्जांचे झेरॉक्स काढण्याचे काम सुरू असून सूरज पाटील या तरूणाने हे अर्ज अनधिकृतपणे बाळगल्याचे तक्रारदारांनी म्हटले होते. मतदान नोंदणी अधिकारींनी या तक्रारीनंतर सहाय्यक मतदान नोंदणी अधिका-यांना संबंधित झेरॉक्स सेंटरवर पाठविले. या सेंटरमध्ये ३४०० अर्ज सूरज पाटील याने तिथे आणली असल्याचे समजले. या अर्जाची पाहणी केल्यावर ११ मतदान केंद्रांचे हे अर्ज होते. यातील सर्वाधिक अर्ज हे पाच केंद्रावरील तर सहा केंद्रावरील फक्त एक एक प्रत अर्जाचे असल्याचे छाननीत समोर आले.

हे अर्ज बाळगणे व अनधिकृतपणे झेरॉक्स काढल्याने सूरज पाटील याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगीतले. तसेच ज्या पाच केंद्रावरील सर्वाधिक अर्ज येथे सापडलेत त्या पाचही संबंधित बीएलओंवरही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचेही जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले. त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे संबंधित विभागांना सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. त्यामुळे एसआयआर अर्ज झेरॉक्स दुकानात सापडल्याच्या प्रकरणाला आता प्रशासकीय कारवाईचे वळण मिळाले आहे.