पनवेल : मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी (एसआयआर) प्रक्रिया सुरू असतानाच गुरूवारी पनवेल विधानसभा मतदारसंघातील एसआयआर अर्ज खारघरमधील एका झेरॉक्स दुकानात आढळल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. हे अर्ज खासगी व्यक्तींकडे कसे पोहोचले, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवर एक ध्वनीचित्रफीतीव्दारे उपस्थित केला आहे. परंतू, हे अर्ज १७ ऑगस्ट रोजी अपलोड करण्यात आले असून, बीएलओंनी ते झेरॉक्स काढण्यासाठी दुकानात ठेवले होते का, याची चौकशी करून खुलासा घेतला जाईल, असे पनवेलचे प्रांताधिकारी पवन चांडक यांनी स्पष्ट केले.

तर याबाबत भारतीय जनता पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचा दावा पनवेलचे महापौर नितीन पाटील यांनी केला आहे.   देशभरात मतदार याद्यांचे एसआयआर सुरू असून पनवेल विधानसभा मतदारसंघात ६ लाख ८४ हजार मतदारांपैकी सुमारे ४ लाख ३९५ मतदारांचे एसआयआर पूर्ण झाले आहे. सुमारे २ लाख ८३ हजार मतदारांचा अद्याप शोध लागलेला नाही. महसूल विभागामार्फत ही प्रक्रिया सुरू असून, एसआयआरनुसार प्रारूप मतदारयादी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी बालेश भोजने यांनी खारघर सेक्टर १९ मध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाग क्रमांक १४९ तसेच अन्य भागांच्या एसआयआर अर्जांच्या झेरॉक्स काढल्या जात असल्याचा आरोप केला आहे.

हे शासकीय कागदपत्र असताना ते भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडे कसे आले, असा सवाल त्यांनी केला. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आल्याचे भोजने यांनी सांगितले. या वेळी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्की करण्यात आल्याचा तसेच मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप भोजने यांनी केला आहे. पोलिसांनी एसआयआर अर्ज ताब्यात घेत संबंधित कार्यकर्त्याला कारमध्ये बसविले. त्यानंतर खारघर पोलीस ठाण्याच्या आवारातून तो पळून गेल्याचा दावाही भोजने यांनी केला.
एसआयआर अर्ज बीएलओंना प्रत्यक्ष पडताळणीच्या कामासाठी आवश्यक आहेत. सध्या या अर्जांमुळे मतदारसंख्येत कोणतीही वाढ होणार नसल्याचे चांडक यांनी स्पष्ट केले. ३१ ऑगस्टनंतर प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

या प्रकरणाशी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा काडीचाही संबंध नाही. विरोधी पक्ष नेहमीप्रमाणे आरोप करत राहतात. सर्वच राजकीय पक्षांनी एसआयआर मोहीमेत मदत केली आहे. मतदार नोंदणीची माहिती सर्वच राजकीय पक्षांकडे उपलब्ध आहे. सध्या काही मतदानाची वेळ नाही. त्यामुळे हे अर्ज प्रत्यक्ष पडताळणीसाठी बीएलओंना लागणार आहेत. – नितीन पाटील, महापौर, पनवेल महापालिका