पनवेल – खारघर उपनगरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने रहिवाशांना दररोज हजारो रुपये खर्च करून टॅंकरचे पाणी खरेदी करावे लागत आहे. कोट्यवधी रुपये मोजून सदनिका खरेदी केलेल्या नागरिकांना मूलभूत पाणीपुरवठ्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने सिडकोच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

धरणाने तळ गाठला तसेच एल निनो या नव्या संकटांचा आधार घेऊन पनवेलमधील सर्वच उपनगरांमध्ये सरकारी विभागांनी १० टक्के पाणी कपात सुरू केली असली तरी जी मंडळी गेल्या अनेक वर्षे उन्हाळ्यासह पावसाळ्यातही अपु-या पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे अशा रहिवाशांना यंदाही पाणी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. 

खारघरच्या सेक्टर ३५ मधील अरिहंत अनाया या गृहनिर्माण संकुलात १६३ सदनिका असून या सोसायटीसह परिसरातील अनेक इमारतींना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नळांना दिवसातून केवळ काही मिनिटेच पाणी येत असल्याने दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. परिणामी, टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे.

अरिहंत अनाया सोसायटीमधील पदाधिकारी विशाल विक्रम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी टॅंकरसाठी वार्षिक सुमारे १५ लाख रुपये खर्च होत होता. मागील वर्षी हा खर्च ३० लाख रुपयांवर पोहोचला. सरकारची निवडणूक संपल्यावर हा खर्च कमी होईल अशी अपेक्षा होती मात्र तो खर्च दुप्पटीवर पोहचला. यंदा पाणीटंचाई अधिक तीव्र झाल्याने दररोज पाच टॅंकर मागवावे लागत असून त्यासाठी दिवसाला सुमारे २,८०० ते ३,००० रुपये प्रति टॅंकर खर्च होत आहे.

नियमित देखभाल शुल्काव्यतिरिक्त प्रत्येक कुटुंबाला पाण्यासाठी स्वतंत्र आर्थिक भार सहन करावा लागत आहे. पाणीटंचाईवर उपाय म्हणून सोसायटीने बोअरवेलचा पर्यायही वापरून पाहिला. मात्र भूजलाची गुणवत्ता समाधानकारक नसल्याने बोअरवेलची योजना फसली. त्यामुळे टॅंकर हेच प्रमुख साधन बनले आहे. खारघर येथील रहिवाशांच्या मते, पाणीपुरवठ्याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी सिडकोच्या कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागते. ऑनलाइन तक्रार निवारण किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून थेट पाठपुरावा करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उपलब्ध नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

सिडकोकडून टंचाईग्रस्त भागांना टॅंकर पुरवठा केला जात असल्याचा दावा केला जात असला तरी तो अपुरा असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. अरिहंत अनाया सोसायटी महिन्याला ९० ते ९५ टॅंकर पाणी खरेदी करते त्याच सोसायटीला महिन्याला केवळ चार टॅंकर मिळल्यास कसे भागेल असा प्रश्न या सोसायटीतील रहिवासी विशाल विक्रम यांनी उपस्थित केला आहे.  दरम्यान, खारघर, तळोजा, कळंबोली आणि पनवेल परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत जलस्रोत आणि पाणीपुरवठा योजनांचा विस्तार झालेला नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नवी मुंबई विमानतळ आणि गृहबांधणी व भूखंड विक्री यांना राज्य सरकार व सिडको मंडळाने प्राधान्य दिले.

मात्र जलयोजना आणि धरण प्रकल्पांकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याने आजची परिस्थिती निर्माण झाल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली .
पाण्यामुळे महागडे शहरखारघर व तळोजा या उपनगरांमध्ये सर्वाधिक टॅंकरचे पाणी खरेदी केले जाते. त्यामुळे मासिक देखभाल दुरूस्ती शुल्काच्या निम्मा खर्च पाण्यासाठी होतोय. यामध्ये पिण्यासाठी टॅंकरचे पाणी वापरता येत नसल्याने बाटलीबंद पाणी निम्या रहिवाशांना खरेदी करावे लागते. अनेकांनी घरात पाणी शुद्धीकरण उपकरण बसवले. मात्र तेही उपकरण क्षमतेपेक्षा अशुद्ध पाणी शुद्ध करू लागल्याने फोल ठरली आहेत. या सर्वामुळे खारघर व तळोजा ही महागडी शहर बनत चालली आहेत.