पनवेल : महावितरणच्या रोहीत्रांमधील तांबे आणि अन्य साहित्य चोरीच्या मालिकेचा पनवेल शहर पोलिसांनी पर्दाफाश करत पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. तांब्याच्या वाढलेल्या बाजारभावाचा फायदा घेण्यासाठी निर्जन भागातील तसेच सीसीटीव्ही नसलेल्या रोहीत्रांना लक्ष्य करून ही टोळी चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. पनवेल शहर आणि उलवे परिसरातील १० गुन्ह्यांची उकल या कारवाईमुळे झाली असून न्यायालयाने मुख्य चार आरोपींना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
एप्रिल महिन्यापासून पनवेल शहर आणि उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत महावितरणच्या रोहीत्रांमधून तांबे व इतर साहित्य चोरीचे एकापाठोपाठ १० गुन्हे दाखल झाले होते. या चोरींमुळे महावितरणला आर्थिक फटका बसत होता, तसेच वीजपुरवठ्यावरही परिणाम होत होता.
या प्रकरणाचा तपास पनवेल शहर पोलीसांकडून सुरू होता. या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी नूकतेच पदभार स्विकारल्यानंतर रोहीत्रातील साहीत्य चोरांची माहिती काढण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. तपासादरम्यान आरोपी सीसीटीव्ही नसलेल्या किंवा निर्जन भागातील रोहीत्रांची निवड करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपींचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. अखेर पोलीस नाईक सम्राट डांकी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अमर मुश्ताक अहमद, शिवम अमरनाथ शर्मा, गणेश मनोज शाहू आणि आलोक अजय गौतम यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकते, पोलीस हवालदार योगेश दिवेकर, पोलीस नाईक सम्राट डांकी, अनिल चव्हाण तसेच पोलीस शिपाई दत्ता जाधव, साईनाथ मोकल, विशाल दुधे आणि सचिन कोर यांनी ही कारवाई केली.चौकशीदरम्यान आरोपी दिवसा निर्जन भागातील रोहीत्रांची पाहणी करून रात्री त्यामधील तांबे आणि इतर साहित्य चोरी करत असल्याची कबुली दिली. काही ठिकाणी त्यांनी दिवसाढवळ्याही चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. चोरी केलेले तांबे भंगार व्यावसायिक लईक खान याच्यामार्फत विकले जात असल्याचे उघड झाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी सोमवारी (ता.२०) मध्यरात्री त्यालाही अटक केली.
महावितरणकडून तांत्रिक बिघाड झाल्यास तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काही ठिकाणी अतिरिक्त रोहीत्र राखीव ठेवण्यात येतात. बंद अवस्थेतील या रोहीत्रांमध्ये तांब्याचे साहित्य उपलब्ध असल्याची माहिती आरोपींना होती. त्याचाच फायदा घेत त्यांनी अशा रोहीत्रांना लक्ष्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून या टोळीने इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा पुढील तपास सुरू आहे.
