पनवेल – पनवेलकरांना पुढील पाच वर्षे मालमत्ता कर वाढवणार नाही, न्हावाशेवा टप्पा–३ जलयोजनेचे काम वर्षभरात पूर्ण करून मुबलक पाणी देणार, महापालिकेची स्वतंत्र बससेवा सुरू करणार आणि झोपडपट्टीधारकांना परवडणारी घरे देण्यासाठी सर्वोत्तम पुनर्वसन योजना राबवणार, अशा ठोस आश्वासनांसह आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी पनवेल शहरातील मार्केटयार्डमधील सभागृहात भाजपचे ‘व्हिजन २०३०’ संकल्पपत्र जाहीर केले.
“स्मार्ट पनवेल” हा नारा देत त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी विकासाचा सविस्तर आराखडा नागरिकांसमोर मांडला.पनवेलचे पर्यावरण, उद्योग आणि कनेक्टिव्हिटीचा संगम जपत आधुनिक स्मार्ट सिटी उभारण्याचा निर्धार ठाकूर यांनी व्यक्त केला. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे पनवेलला मोठ्या प्रमाणात निधी व प्रकल्प मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिलार धरणासाठी मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला आर्थिक खर्च करण्यासाठी नेमल्याने पनवेल महापालिकेचा मोठा भार कमी झाल्याने मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले.
“माझं शहर, माझा अजेंडा” उपक्रमातून नागरिकांनी दिलेल्या सूचनांवर आधारित हे संकल्पपत्र तयार करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या व्हिजनमध्ये कळंबोली, कामोठे, तळोजा, पनवेल–नवीन पनवेल, खारघर आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र विकास आराखडे आहेत. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मल्टिलेव्हल पार्किंग, अंडरग्राउंड केबल्स, स्मार्ट सिग्नल यंत्रणा, तसेच महापालिकेच्या स्वमालकीच्या बससेवेसाठी एनएनएमएमटीसोबत अन्यथा इतर महापालिकांसोबत इंटरग्रेटेड परिवहन यंत्रणा प्रस्तावित करण्याचे धोरण असल्याचे सांगीतले.
आरोग्यासाठी तळोजा, खारघर मल्टीस्पेशालिटी रूग्णालय, पनवेलमध्ये ४०० बेडचे हिरकणी रूग्णालय उभारले जाणार आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी मियावाकी फॉरेस्ट, बोटॅनिकल गार्डन, बटरफ्लाय पार्क, कचरा व्यवस्थापनासाठी स्मार्ट बिन्स व मिस्ट कॅनन ट्रॅकद्वारे प्रदूषण नियंत्रणाची योजना आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, कमांड अँड कंट्रोल सेंटर, तसेच ई-गव्हर्नन्स व महापौर सहाय्यता कक्ष उभारण्यात येणार आहे.खेळ, संस्कृती व तरुणांसाठी क्रीडा संकुले, नाट्यगृहे, ग्रंथालये, अभ्यासिका, रोजगार मेळावे आणि सोलर एनर्जीवर आधारित स्वयंपूर्ण सोसायट्यांचा आराखडा यात समाविष्ट आहे. ग्रामीण भागात पाणी, रस्ते, शाळा, आरोग्य केंद्रे व तलावांचे सुशोभिकरण करून सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.
