पनवेल पालिका आयुक्तांच्या बदलीप्रकरणी सरकारची दुटप्पी भूमिका

पनवेलकरांच्या व्यापक लोकहितासाठी पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना सेवेत कायम ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला अवघे चार दिवस उलटले असताना सोमवारी अचानक आयुक्तांची बदली करण्यात आली. त्यामुळे पनवेलमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बदलीसाठी ठाकूर पिता-पुत्रांनी सरकारवर दबाव आणल्याची चर्चा सोमवारी पनवेलमध्ये रंगली होती.

पालिका आयुक्त सत्ताधारी पक्षाला विश्वासात न घेता नागरी कामांचे निर्णय घेत असून अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, यांच्यावर कारवाई करत आहेत, असे भाजपचे म्हणणे होते. त्यामुळे सत्ताधारी आयुक्तांवर नाराज होते. ही नाराजी काही महिन्यापांसून शिगेला पोहोचल्याने मार्चमध्ये आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करून तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. हा ठराव मंजूर करताना सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी आयुक्तांवर अनेक गंभीर आरोप केले होते. यात हुकूमशाही कारभारापासून ते भ्रष्टाचारापर्यंत सर्व आरोपांचा समावेश होता.

नगरविकास विभागाने १२ एप्रिलला हे सर्व आरोप फेटाळून लावत, ‘हा अविश्वास ठराव मंजूर करणे हे व्यापक लोकहिताविरोधात निर्णय घेणे ठरेल,’ असे म्हटले होते. त्यामुळे आयुक्त आता आपला कार्यकाळ पूर्ण करणार अशी खात्री पनवेलवासीयांना वाटू लागली होती, मात्र सोमवारी अनेक अधिकाऱ्यांची बदली करताना त्यांचीही मुंबईत बदली करण्यात आली. त्यांच्या जागी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

शासनाने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा पनवेलमध्ये सुरू  आहे. डॉ. शिंदे यांच्या विरोधात मंजूर करण्यात आलेला अविश्वास ठराव फेटाळताना सरकार अधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्यात आला तर चारच दिवसांत बदली करून भाजपा आमदारांच्या मताची कदर सरकार करीत असल्याचे दृश्य निर्माण करण्यात आले. शिंदे यांची बदली सत्ताधारी भाजपचे सर्वेसर्वा माजी खासदार रामशेठ ठाकूर व त्यांचे आमदार पुत्र प्रशांत ठाकूर यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे शिंदे यांच्या बदलीने सत्ताधारी भाजपाच्या गोटात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

शहराच्या भल्याचा विचार न करता सत्ताधारी व प्रशासन या दोघांनी ताठर भूमिका घेतली. मुळात ही पालिका स्थापन करण्याची घाई केली गेली आहे. अनेक प्राधिकरणांच्या अधिकारांमुळे हे शहर फसले आहे. पालिका स्थापन झाल्यापासून पनवेलकरांना आगीतून फुफाटय़ात पडल्यासारखे वाटत आहे. पाणीप्रश्न, रस्ते, धूळ यासारख्या प्रश्नांनी गंभीर रूप धारण केले असताना वाद निर्माण करण्यात सत्ताधारी व प्रशासन मश्गूल होते. यात बदल होईल अशी अपेक्षा आहे.

– चंद्रशेखर सोमण, शिवसेना नेते, पनवेल</strong>