पनवेल : पनवेल महापालिकेच्या हद्दीत गव्हाण आणि वडघर जिल्हा परिषद गटांमधील १९ गावांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. या विस्तारामुळे महापालिकेच्या क्षेत्रात सुमारे ७०.३१ चौरस किलोमीटरची भर पडणार असून, एकूण क्षेत्रफळ १८०.३७ चौरस किलोमीटर होणार आहे. मात्र, या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना विरोधी बाकांवरील सदस्यांनी सभात्याग केला. या विस्ताराला शासनाची परवानगी मिळाल्यानंतर महापालिकेच्या महसूलात तब्बल दिडशे कोटी रूपयांची वाढ होऊ शकेल असा दावा करण्यात आला आहे.
गव्हाण आणि वडघर परिसरातील १९ गावांचा महापालिकेत समावेश करण्याची मागणी तेथील ग्रामस्थांकडून करण्यात येत असल्याकडे महापौर नितिन पाटील यांनी प्रस्तावावर निवेदन सुरू असताना माहिती दिली. महापालिका प्रशासनाने ४ एप्रिल २०२५ रोजी शासनाला प्रस्ताव सादर केला होता. राज्याच्या नगरविकास विभागाने १४ ऑक्टोबरला महापालिकेला पत्र पाठवून या समावेशाबाबत सर्वसाधारण सभेचा ठराव आणि प्राथमिक अधिसूचनेचा मसुदा सादर करण्याचे निर्देश दिले होते. या प्रस्तावाला विरोधी पक्षांनी विरोध केला. सभात्याग करण्यापूर्वी ग्रामीण तसेच शहरी भागात पनवेल महापालिका पुरेशा सुविधा देऊ शकत नाही, असेही सांगितले. त्यावर स्पष्टीकरण देताना सभागृह नेते बिनेदार यांनी महापालिकेकडून ग्रामीण भागात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. महापालिकेने ३३ जलकुंभ उभारण्याचे नियोजन केले असून, त्यापैकी १८ पूर्ण झाले आहेत, तर सात जलकुंभांची कामे सुरू आहेत. पिसार्वे तलावाचा विकास तसेच सिद्धी करवले आणि आडिवली तलावांची कामे पूर्ण झाली आहेत. पथदिवे आणि रस्त्यांचे काँक्रीटीकरण यांसह अन्य विकासकामेही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या ग्रामपंचायतींना अशा स्वरूपाची कामे करणे शक्य होत नव्हते, असेही त्यांनी नमूद केले.
रोजगाराच्या संधींचा स्थानिक तरुणांना लाभ
- आयुक्त मंगेश चितळे यांनी या विस्तारामुळे महापालिकेच्या मालमत्ता कराच्या महसुलात सुमारे १५० कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली. प्रस्तावित क्षेत्रात ऐरोसिटी, एज्युसीटी, स्पोर्टसीटी आणि मेडिसिटीसारखे प्रकल्प विकसित होत आहेत.
- या परिसराचे नियोजन प्राधिकरण सिडकोकडेच राहणार असल्याने सुनियोजित विकासाला मदत होईल. तसेच या प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींचा स्थानिक तरुणांना लाभ मिळू शकेल, असे त्यांनी सभागृहाला अवगत केले.
- सध्या पनवेल महापालिकेचे क्षेत्र ११०.०६ चौरस किलोमीटर असून, २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ५ लाख ९ हजार ९०१ आहे. प्रस्तावित १९ गावांची लोकसंख्या ५३ हजार २०३ असल्याने समावेशानंतर महापालिकेची लोकसंख्या ५ लाख ६२ हजार १०४ होईल.
- सिडको नियोजन प्राधिकरण असलेल्या क्षेत्रातून मिळणाऱ्या अधिमूल्याच्या २५ टक्के रकमेचा लाभही महापालिकेला मिळू शकणार आहे.
