पनवेल – पनवेल महानगरपालिकेने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उभारलेल्या ‘एअरबीन’ यंत्रणेमुळे उलट वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोडपाली सिग्नल येथे बसवलेल्या या यंत्रामुळे सिग्नलच झाकला गेल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून, पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने उभारलेली ही योजना नियोजनाअभावी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शहरातील वाढते प्रदूषण लक्षात घेऊन एकूण १० ठिकाणी ‘एअरबीन’ ही हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक यंत्रासाठी सुमारे ९४ लाख २३ हजार रुपये खर्च करण्यात आले असून, एकूण ९ कोटी ४२ लाख रुपयांचा प्रकल्प राबवण्यात आला आहे. या यंत्राद्वारे हवेतील धूळकण आणि कार्बन खेचून त्यावर पाण्याद्वारे प्रक्रिया केली जाते. यासाठी पाच हजार लिटर क्षमतेची टाकी बसवण्यात आली असून, दररोज सुमारे चारशे लिटर पाण्याचा वापर होणार आहे.

मात्र, प्रत्यक्षात या यंत्रणांची उभारणी करताना योग्य जागेची पाहणी न केल्याचे समोर आले आहे. पनवेल-मुंब्रा महामार्गावरील रोडपाली सिग्नल चौकात बसवलेल्या ‘एअरबीन’मुळे रोडपालीकडून नावडे गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील सिग्नल पूर्णपणे झाकला गेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना सिग्नल दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

शहरातील कोपरा गाव, नावडे राणी लक्ष्मीबाई चौक, कळंबोली लेबरनाका, कळंबोली सर्कल महात्मा गांधी मिशन रूग्णालय आणि कामोठे प्रवेशव्दार या पाच ठिकणी हे यंत्र कार्यान्वित झाले आहे. तसेच खारघर (हिरानंदानी कॉम्प्लेक्स), सेक्टर २० मधील भगवती टॉवरजवळ, रोडपाली सिग्नल, पनवेलमधील हुतात्मा स्मारक उद्यान आणि कृष्णाळे तलावाजवळील भाजी मंडईच्या वाहनतळ या उर्वरीत पाच ठिकाणी या यंत्राची उभारणी पुर्ण झाली असून अद्याप ही पाच यंत्रे कार्यान्वित झालेली नाहीत.

वाढत्या शहरीकरणामुळे प्रदूषणाचा स्तर वाढत असताना ही योजना महत्त्वाची मानली जात असली, तरी अंमलबजावणीतील त्रुटींमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी तातडीने दुरुस्ती करून योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महापालिकेच्या पर्यावरण विभाग आणि मालमत्ता विभाग यांच्या संयुक्त पाहणीतून महापालिका क्षेत्रात १० ठिकाणी एअरबीन यंत्र उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. रोडपाली सिग्नलजवळील एअरबीन या यंत्रामुळे वाहतूकीमधील सिग्नल दिसण्यास अडचण होत असल्यास नवीन जागेत ते यंत्र बसविण्याच्या सूचना देत आहोत. याचा खर्च महापालिकेवर येणार नाही याची सुद्धा महापालिका काळजी घेईल. – स्वरूप खारगे, उपायुक्त, पर्यावरण विभाग, पनवेल महापालिका