पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील १७६ रिक्त पदांच्या सरळसेवा भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सध्या बिंदूनामावली (रोस्टर) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर लेखी परीक्षेचा मार्ग मोकळा होईल. यापूर्वी ३७७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर आता रिक्त राहिलेल्या आणि नव्याने उपलब्ध झालेल्या पदांसाठी पुन्हा भरती केली जाणार असल्याने उमेदवारांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे.

पनवेल महापालिकेच्या १,०४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यापैकी सध्या १७६ पदे रिक्त असल्याने उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडतो. त्यामुळे अनेक विभागांमध्ये सेवानिवृत्त व अनुभवी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करून कामकाज सुरू आहे.

महापालिकेचे तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख यांच्या कारकिर्दीत ३७७ पदांच्या भरती प्रक्रियेची सुरूवात झाली. महापालिकेचे उपायुक्त कैलास गावडे यांच्या देखरेखीखाली ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. डिसेंबर २०२३ मध्ये ४१ संवर्गांतील गट ‘अ’ ते ‘ड’ मधील ३७७ पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून ५४ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. टीसीएसच्या माध्यमातून राज्यातील २१ जिल्ह्यांतील ५७ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. विद्यमान आयुक्त मंगेश चितळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडल्याने कोणत्याही गैरप्रकाराच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या नव्हत्या.

पनवेल महापालिकेच्या सरळसेवेच्या परीक्षेदरम्यान राज्यभरात तलाठी, ग्रामसेवक, जिल्हापरिषद, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या भरतीत प्राविण्य मिळविलेल्या काही उमेदवारांना त्यांच्या सोयीनूसार इतर शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रुजू होण्याची संधी मिळाल्याने सुमारे १३४ पदे रिक्त राहिली. त्याचबरोबर इतर पदेही रिक्त झाल्याने आता १७६ पदांसाठी नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

पदे कोणती?

रिक्त पदांमध्ये गट ‘अ’ मधील ४, गट ‘ब’ मधील ३, गट ‘क’ मधील १६१ आणि गट ‘ड’ मधील ४५ पदांचा समावेश आहे. यामध्ये लिपिक-टंकलेखक, अग्निशामक, सफाई कामगार, शिपाई, मजूर, वाहनचालक, स्वच्छता निरीक्षक, भूमापक, आरेखक, परिचारिका, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व विद्युत), माहिती व जनसंपर्क अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी, सहाय्यक नगररचनाकार, वैद्यकीय अधिकारी, हिवताप अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, जैववैद्यकीय अभियंता या पदांचा समावेश आहे.