पनवेल : तळोजा येथील अमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर अखेर या गुन्ह्यातील संशयीत आरोपी मोहम्मद वसीम चौधरी उर्फ वसीम लुंगीवाला याच्या कळंबोलीतील अनधिकृत गोट फार्मवर सरकारी यंत्रणेने बुलडोझर फिरवला. गोट फार्मच्या आडून सुरू असलेला अमली पदार्थांचा अवैध व्यवसाय उद्ध्वस्त करण्यासाठी पनवेल महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांना स्पष्ट इशारा देण्यात आल्याचे मानले जात आहे.
मार्च महिन्यात नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) तळोजा परिसरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली होती. या प्रकरणात आतापर्यंत ३८ आरोपींना अटक करण्यात आली असून मोहम्मद वसीम चौधरी उर्फ वसीम लुंगीवाला हा त्यातील प्रमुख संशयित आरोपी आहे. एएनसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून वसीमला अटक केली होती. त्यावेळी त्याच्या गोट फार्ममधून सुमारे तीन लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
तपासात वसीम हा कळंबोलीतील महाराष्ट्र शाळेमागील सेक्टर १३ परिसरात बेकायदा जागा ताब्यात घेऊन गोट फार्मच्या नावाखाली अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिकांचा विश्वास संपादन करून तो हा अवैध व्यवसाय चालवत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये तो सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईमध्ये मारामारी, चोरीसह विविध स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहेत. तर नवी मुंबई पोलीस ठाण्यांमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत.
या घटनेनंतर अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्याचे निर्देश नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाची अमलबजावणीसाठी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे पाठपुरावा केला. पोलीस अधिकारी निगडे यांनी आयुक्तांची भेट घेऊन संबंधित गोट फार्मवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर महापालिकेने गुरुवारी बुलडोझरच्या सहाय्याने संपूर्ण अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले.
या कारवाईसाठी परिमंडळ – ३ च्या पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला. त्यामुळे कारवाई कोणताही अनुचित प्रकार न घडता पूर्ण झाली. अमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराला आश्रय देणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
