पनवेल – पनवेल महापालिका क्षेत्रातील जनगणनेअंतर्गत घरगणना व यादी गटाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून शुक्रवारपर्यंत ९८.२३ टक्के काम पूर्ण झाले आहे. सुमारे सव्वातीन लाख घरांची नोंदणी करण्यात आली असून महापालिका क्षेत्रातील मालमत्ता, कुटुंबांची संख्या आणि नागरिकांच्या राहणीमानासंदर्भातील महत्त्वाची माहिती शासनाच्या दप्तरी नोंदविण्यात आली आहे.

पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. शहर जनगणना अधिकारी अभिषेक पराडकर यांच्या नेतृत्वाखाली २० प्रभागांमध्ये घरगणनेचे काम करण्यात आले. या कामासाठी सहा वार्ड अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण १,७४४ प्रगणकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण केले.

महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १ नावडे येथे ४४७, प्रभाग क्रमांक २ खारघर येथे २५०, प्रभाग क्रमांक ३ कळंबोली येथे ३५५, प्रभाग क्रमांक ४ कामोठे येथे २२४, तर प्रभाग क्रमांक ५ पनवेल-१ येथे २४६, पनवेल २ प्रभाग क्रमांक ६ येथे ३२२ प्रगणकांनी काम केले. प्रभागनिहाय नियोजन करून जनगणनेचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले.

प्रभाग क्रमांक १ साठी प्रसेनजीत कारलेकर, प्रभाग क्रमांक २ साठी डॉ. वैभव विधाते, प्रभाग क्रमांक ३ साठी सुबोध ठाणेकर, प्रभाग क्रमांक ४ साठी रूपाली माने, प्रभाग क्रमांक ५ साठी स्वरूप खारगे आणि प्रभाग क्रमांक ६ साठी डॉ. मधुलिका लाड यांनी समन्वयाची जबाबदारी सांभाळली.

महापालिकेला १६ मे ते १४ जून या कालावधीत घरगणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये प्रभाग क्रमांक ५ ने सर्वाधिक वेगाने काम पूर्ण करत ५ जून रोजी १०० टक्के घरगणना पूर्ण केली. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल यांनी या प्रभागातील कामाचे विशेष कौतुक केले. महापालिकेचे आस्थापना विभागाचे उपायुक्त कैलास गावडे यांनीही वेळोवेळी कामाचा आढावा घेत प्रगतीवर लक्ष ठेवले.

या सर्वेक्षणादरम्यान प्रगणकांनी ३३ विविध मुद्द्यांवर माहिती संकलित केली. घराचे स्वरूप, बांधकामाचा प्रकार, शौचालयाची उपलब्धता, कुटुंबातील सदस्यांची संख्या आदी माहिती गृहनिर्माण संस्था, इमारती आणि स्वतंत्र घरांमध्ये जाऊन नोंदविण्यात आली. या माहितीच्या आधारे शहर नियोजन, पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकास आराखड्यांसाठी आवश्यक आकडेवारी उपलब्ध होणार आहे. पुढील टप्यात झोपडपट्यांमधील कुटूंबांची जनगणना होणार आहे.

“जनगणना सर्वेक्षणाच्या कामासाठी प्रगणक आणि चार्ज अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वेळेत करण्यात आल्या. तसेच संपूर्ण प्रक्रियेचे नियोजनबद्ध पद्धतीने नियमन आणि सातत्याने आढावा घेण्यात आला. सर्वच प्रगणक व अधिका-यांनी यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे पनवेल महापालिकेला घरगणनेचे काम निर्धारित मुदतीपूर्वी पूर्ण करण्यात यश आले. या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि प्रगणकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.” – मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महानगरपालिका