पनवेल : मुंबई महानगर क्षेत्रातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेलमध्ये उभारल्याने शहराच्या विकासाला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मागील सहा वर्षांपूर्वी पनवेल शहरातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळण्यासाठी महापालिकेने तब्बल १९०० कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. महापालिकेने २०१९ मध्ये पुढील २० वर्षांचा शहर विकास आराखडा (सीडीपी) बनवला. या आराखड्यानूसार साडेचार हजार कोटी रूपयांची विकासकामे करण्याचे नियोजन करण्यात आले. या नियोजित कामांपैकी महापालिकेने ४० टक्के कामांचे ध्येय गाठले आहे. पुढील वर्षात यातील ६० टक्के कामे हाती घेण्याचा महापालिका प्रशासनाचा मानस आहे. पनवेल शहराची वाढती लोकसंख्या, विमानतळामुळे वाढणारी वर्दळ आणि आसपासच्या भागांचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेता हा आराखडा पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल महापालिका क्षेत्राला लागून असल्याने शहराची ओळख जागतिक पातळीवर पोहोचली आहे. महापालिका क्षेत्रातील २९ गावे तसेच सिडकोच्या सात वसाहतींना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा पुरविणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. महापालिकेच्या पूर्वेला ‘नैना’ प्रकल्पांतही सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची आखणी सिडकोने केली आहे. या दरम्यान पनवेल महापालिकेचे तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २०१९ साली शहराचा पुढील २० वर्षांसाठीचा म्हणजे २०४१ पर्यंतचा शहर विकास आराखडा (सीडीपी) बनविण्यात आला. भविष्यातील शहराची गरज ध्यानात घेऊन सीडीपीत सूचवलेल्या कामांप्रति जसे शासनाच्या विविध योजना येतात याच योजनेतून या सीडीपीत सूचवलेल्या कामांवर टप्याटप्याने खर्च केला जातो.
महापालिका स्तरावर बनवलेल्या सीडीपीनूसार आतापर्यंत सर्वात मोठा खर्च घनकचरा व्यवस्थापनासाठी ६३७ कोटी रूपये करण्यात आले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात शहरानूसार तळोजा परिसरात १० गावांचा ग्रामीण परिसर आहे. या गावांमधील शेतजमीनींवर शहर उभारण्यासाठी तेथे रस्त्यांचे जाळे, नाले, मलनिसारण व्यवस्था, जलसंधारण आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याचे नियोजित आहे. आतापर्यंत सीडीपीनूसार महापालिकेने रस्ते बांधकामासाठी तब्बल ४९९ कोटी रूपये खर्च केले आहेत. तसेच पाणी समस्या सुटण्यासाठी महापालिकेने २८५ कोटी रूपये खर्च केले आहेत. गावांगावातील आणि शहरातील पथदिव्यांसाठी महापालिकेने २१३ कोटी रूपये खर्च केले आहे. तत्कालिन आयुक्त देशमुख यांच्या काळात सीडीपी तयार करून प्रसिद्ध करून त्यावर खर्चाची सुरूवात झाली. आयुक्त मंगेश चितळे यांनीही याच विकासकामांना प्राधान्य देत सीडीपीनूसार अजून गतीने काम करण्याची आखणी केली आहे. महापालिकेची सध्याची लोकसंख्या सुमारे १५ लाखावर पोहचली आहे.
शाश्वत शहराचा विकास लक्षात घेऊन व्यापक शहर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यात रस्ते, पथदिवे, घनकचरा, पाणीपुरवठा यांसोबत भविष्यात झोपडपट्टी पुनर्वसन, शाळा, रुग्णालये, उद्याने, मैदाने, स्टेडियम आणि बसआगार यांसाठी महापालिकेला अजून वेगाने काम करावे लागणार आहे. सध्या सिडकोच्या अनेक उपनगरांच्या प्रवेशव्दारावर वाहतूक कोंडी ही समस्या भेडसावत आहे. महापालिकेला प्रशस्त आणि अनेक नवे प्रवेशव्दारांचे निर्माण करून वाहनमालकांना दिलासा देण्यासाठी पाऊले उचलावी लागणार आहेत. पनवेल महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे यांनी दिलेल्या माहितीनूसार ४५०८ कोटी रूपयांची विकासकामे सीडीपीमध्ये २० वर्षांचा काळ ध्यानात घेऊन सूचविण्यात आली होती त्यापैकी १९२२ कोटी रूपयांची म्हणजे ४० टक्के कामांचे ध्येय गाठले असून उर्वरीत २,५८६ कोटी रूपयांची कामे अजून महापालिकेने नियोजित केली त्या कामांची अंमलबजावणीची प्रक्रिया महापालिकेची सुरू आहे.
सीडीपीनूसार आतापर्यंत झालेली व सुरू असलेली कामे
पाणी पुरवठा २८५मलनिसारण १०७पावसाळी गटार ३३घनकचरा व्यवस्थापन ६३७ रस्ते बांधकाम ४९९पथदिवे २१३ आरोग्य ६४शिक्षण – ८१ यामध्ये शाळेसाठी भूखंडाची रक्कम आणि नवीन इमारतींचा समावेश आहे. ‘
उत्तम दळणवळणामुळे देशात पनवेल शहर अग्रस्थानी…
पनवेल तालुक्यात केंद्र व राज्य सरकार तसेच सिडको मंडळाच्या महत्त्वाकांक्षी रस्ते व दळणवळण प्रकल्पांमुळे शहराचे राज्यातील महत्त्व लक्षणीयरीत्या वाढणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, विरार-अलिबाग कॉरिडॉर, दिल्ली-मुंबई व मुंबई-बडोदा महामार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळे पनवेल दळणवळणाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे. कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग, खांदेश्वर-तळोजा मेट्रो, हैद्राबाद मुंबई हायस्पीड रेल्वे आणि नवीन रेल्वे मार्गामुळे पनवेल शहराचे दळणवळण अधिक मजबूत होईल. नैना प्रकल्पांतर्गत सूमारे साडेआठ हजार कोटी रूपये खर्च करून सिग्नलविरहित रस्ते उभारले जाणार असून, या सर्व प्रकल्पांमुळे पनवेल शहराचा वेग भविष्यात मुंबईला मागे टाकेल.
पनवेल महापालिकेने नियोजित केलेल्या सीडीपीनूसार विकासकामे करत आहे. स्मार्ट, शाश्वत आणि संतुलित पनवेल शहर बनविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. – मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका
