पनवेल : शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन अप्पासाहेब वेदक अर्थात देहरंग धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणाची उंची सध्याच्या पातळीपेक्षा २० मीटरने वाढविल्यास पाणी साठवण क्षमतेत मोठी वाढ होऊन शहराचा दीर्घकालीन पाणीप्रश्न मार्गी लागू शकतो, असा अंदाज पनवेल महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी गाव, वाड्यांतील नागरिकांचे पुनर्वसन आणि १,२०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा व बांधकाम विभागाने यासंदर्भात प्राथमिक आराखडा तयार केला आहे. प्रस्तावित विस्तारानुसार मुख्य बंधाऱ्याची उंची २० मीटरने वाढविण्यात येणार असून त्यामुळे धरणातून सध्या उपलब्ध असलेल्या पाणीपुरवठ्याच्या तुलनेत जवळपास दहापट अधिक, म्हणजेच प्रतिदिन १३१ एमएलडी पाणी उपलब्ध होऊ शकते. धरण विस्तारासाठी अंदाजे १,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून धरणातील पाणी शहरापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी योजनेसाठी आणखी २०० कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे.

सध्या देहरंग धरणाचे क्षेत्रफळ १५ हेक्टर असून त्याची साठवण क्षमता ३.५७ दशलक्ष घनमीटर आहे. विस्तारानंतर ही क्षमता ३७.८१ दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढू शकते. त्यासाठी अतिरिक्त २१४ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. प्रस्तावित विस्तारित जलक्षेत्रामुळे टावरेवाडी, मालडुंगे तसेच परिसरातील काही आदिवासी वाड्या आणि शेतघरे प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुनर्वसन हा प्रकल्पातील महत्त्वाचा घटक ठरणार आहे.

माथेरान डोंगररांगालगत असलेल्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरण विस्ताराची संकल्पना व्यवहार्य मानली जात आहे. या प्रकल्पासाठी ‘नागरी आव्हान निधी’ तसेच जागतिक बँकेच्या आर्थिक साहाय्याचा पर्यायही विचाराधीन आहे.

सर्वसाधारण सभेत प्रस्ताव

धरण विस्ताराचा प्राथमिक प्रस्ताव पनवेल महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत (महासभा) सादर केला जाणार आहे. सदस्यांच्या सूचनांनंतर मंजूर ठराव राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर निधी मिळविण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेची विधानपरिषद निवडणूकीची आचारसंहिता सुरू असल्याने जून अखेरीस ही महासभा होण्याची चिन्हे आहेत.

नागरिकांची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान रोडपाली येथील प्रचार सभेत पनवेलचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी शिलार धरणाच्या कामाची प्रक्रिया सुरू केल्याचा दावा केला होता. मुख्यमंत्र्यांनी पनवेल शहराचा वाढता विस्तार आणि सद्यस्थितीतील पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन देहरंग धरणाची उंची वाढविणे आणि विस्तारित धरण प्रकल्पाला तातडीने मंजुरी देणे आवश्यक आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री वॉर रूमच्या देखरेखीखाली घेतल्यास धरण विस्ताराच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळू शकेल आणि पुढील तीन वर्षांत या धरणातून प्रत्यक्ष पाणी पनवेलकरांना उपलब्ध होऊ शकेल. अन्यथा हा प्रस्ताव केवळ कागदावर आणि चर्चेतच राहण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत आहेत.