scorecardresearch

युती धुडकावताच आरोपांच्या फैरी

भाजप-शिवसेना युतीसाठी भाजपने सेनेच्या काही नेत्यांची भेट घेऊन युतीचा प्रस्ताव दिला.

Panvel City Municipal Corporation
पनवेल महानगरपालिका

 

कुवतीपेक्षा जास्त जागा देऊनही प्रतिसाद न दिल्याची भाजपची टीका

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पनवेलमध्ये सव्वा लाख मते मिळाली आणि सेनेला १८ हजार मते मिळाली. तरीही शिवसेनेला भाजपने थेट ३३ टक्के जागा देऊ केल्या, त्यानंतरही त्यांनी युती करण्याची तयारी न दर्शवल्याने भाजपने आता शिवसेनेवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. कुवतीपेक्षा जास्त जागा देऊनही युती न करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा मंगळवारी भाजपच्या काही नेत्यांनी दिला. पनवेलमधील प्रभाग क्रमांक १९ मध्ये भाजपच्या माजी खासदारांचे पुत्र परेश ठाकूर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हा पदाधिकाऱ्यांची बैठक मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात घेण्यात आली. त्यात कार्यकर्त्यांना एकला चालो रेचा नारा दिला.

भाजप-शिवसेना युतीसाठी भाजपने सेनेच्या काही नेत्यांची भेट घेऊन युतीचा प्रस्ताव दिला. मात्र शिवसेनेने १३ दिवस उलटल्यावरही निर्णय न दिल्याने भाजपच्या नेत्यांनी वेळकाढूपणाबद्दल संताप व्यक्त केला. शिवसेनेच्या वाटय़ाला काही प्रभागांमध्ये ५०० तर काही प्रभागांत ११०० मते येणार असल्याचे भाकीत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. ठाकूर यांचे हे भाकीत सेनेच्या बडय़ा नेत्यांच्या जिव्हारी लागल्याने यापुढे पालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप लढा पाहायला मिळणार असल्याची चिन्हे आहेत.

शेतकरी कामगार पक्षाने याबाबत सावध पवित्रा घेतला असून राजकीय मित्र असलेली शिवसेना महाआघाडीत येण्याविषयी सकारात्मक आहे का, याची चाचपणी करण्यासाठी शेकापचे काही नेते मंगळवारी मुंबईत होते. शेकापच्या नेत्यांना याबाबत विचारले असता, शिवसेनेसोबतच्या चर्चेसाठी नव्हे, तर महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी अद्याप युतीच्या निर्णयावर भाष्य न केल्यामुळे पनवेलमध्ये अनेक पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.

मागील निवडणुकीत शिवसेनेला प्रत्येक प्रभागात २०० ते १२०० च्या दरम्यान मते मिळाली आहेत. आम्ही त्यांना कुवतीपेक्षा जास्त जागा देऊ केल्या. भाजपला पाच हजारपेक्षा अधिक मते मिळणार आहेत. तरीही लहान मतांची साथ मिळाल्यास विजय पक्का होईल या अपेक्षेने युतीची बोलणी केली. परंतु १३ दिवस उलटले तरीही निर्णय कळविण्यात आला नाही.  लवकरच प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर करू.

रामशेठ ठाकूर, माजी खासदार

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-04-2017 at 00:52 IST
ताज्या बातम्या