पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि रेल्वेच्या जोडणीमुळे पनवेल परिसरात नागरीकरणाचा वेग वाढत आहे. अशातच पनवेल महापालिकेच्या हद्दवाढीच्या हालचालींनाही राज्य सरकारकडून वेग देण्यात आला आहे. गव्हाण आणि वडघर हे जिल्हा परिषदेचे दोन गट महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मंगळवारी (३ नोव्हेंबर) होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत चर्चेला येणार आहे.

महासभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास महापालिकेच्या हद्दीत सुमारे ७०.३१ चौरस किलोमीटर क्षेत्राची भर पडून परिसरातील सुमारे १९ गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या विस्तारामुळे महापालिकेचे क्षेत्र, लोकसंख्या आणि आर्थिक स्रोत वाढण्याबरोबरच भविष्यातील नागरी सुविधांच्या नियोजनाची जबाबदारीही वाढणार आहे.

पनवेल महापालिकेची स्थापना १ ऑक्टोबर २०१६ रोजी झाली. तत्कालीन पनवेल नगरपरिषद, अंबरनाथ-कुळगाव-बदलापूर व परिसर अधिसूचित क्षेत्रातील ११ गावे आणि सिडको क्षेत्रातील १८ गावे अशा २९ गावांचा समावेश करून महापालिका स्थापन करण्यात आली. सध्या महापालिकेचे क्षेत्र ११०.०६ चौरस किलोमीटर असून, २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ५ लाख ९ हजार ९०१ आहे. महापालिका क्षेत्रात २० प्रभाग आणि चार प्रभाग समित्या आहेत.

पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी गव्हाण व वडघर हे जिल्हा परिषद गट पनवेल महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार मागील वर्षी महापालिकेने ४ एप्रिल रोजी शासनाला प्रस्ताव सादर केला. प्रस्तावित क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण सिडको असल्याने सिडकोचे अभिप्राय घेणे आवश्यक असल्याचे शासनाला कळविण्यात आले होते. त्यानंतर सिडकोने या क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून कायम राहण्याबाबत अनुकूल अभिप्राय दिला.

राज्याच्या नगरविकास विभागाने १४ ऑक्टोबरला पनवेल महापालिकेला पाठविलेल्या पत्रानुसार, गव्हाण आणि वडघर गटांचा समावेश करण्यासंदर्भात महापालिकेची सहमती आहे किंवा कसे, याबाबत सर्वसाधारण सभेचा ठराव करून शासनाला अभिप्राय सादर करायचा आहे. तसेच प्रस्तावित क्षेत्राच्या समावेशासाठी आवश्यक प्राथमिक अधिसूचनेचा मसुदा मराठी आणि इंग्रजी भाषेत, चतुःसीमांसह सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अभिप्रायानंतर प्रत्यक्षात महापालिकेच्या विस्ताराच्या प्रस्तावाला गति मिळण्याची शक्यता आहे.

प्रस्तावित क्षेत्राचे क्षेत्रफळ ७०.३१ चौरस किलोमीटर असून, २०११ च्या जनगणनेनुसार तेथील लोकसंख्या ५३ हजार २०३ आहे. या भागाचा समावेश झाल्यास महापालिकेचे एकूण क्षेत्र सुमारे १८०.३७ चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या ५ लाख ६२ हजार १०४ होईल. प्रस्तावित गावांचा भौगोलिकदृष्ट्या महापालिका क्षेत्राशी संबंध असून, रस्त्यांद्वारेही ही गावे जोडलेली आहेत. या भागातील तालुका स्तरावरील उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय आणि भूमिअभिलेख कार्यालय पनवेल येथे असल्याने प्रशासकीय समन्वय सुलभ होऊ शकतो.

सिडकोच नियोजन प्राधिकरण

पनवेल महापालिकेमध्ये खारघर परिसराचे नियोजन प्राधिकरणाचे अधिकार सरकारने सिडकोकडेच ठेवले आहेत. प्रस्तावित परिसरात उलवे, करंजाडे, पुष्पक नगर या उभारल्या जात असलेल्या उपनगरांसह ऐरोसिटी, एज्युसीटी, स्पोर्टसीटी आणि मेडिसिटीसारखे महत्त्वाचे प्रकल्प विकसित होत आहेत. या क्षेत्राचे नियोजन सध्या सिडकोकडे आहे. महापालिकेच्या हद्दीत समावेश झाल्यानंतरही सिडकोला नियोजन प्राधिकरण म्हणून कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२० मधील तरतुदीनुसार, सिडको नियोजन प्राधिकरण असलेल्या क्षेत्रातून पनवेल महापालिकेला मिळणाऱ्या अधिमूल्याच्या २५ टक्के रकमेचा लाभ मिळू शकतो. याशिवाय नव्याने समाविष्ट होणाऱ्या क्षेत्रातील मालमत्तांमधून मालमत्ता कराच्या स्वरूपात महापालिकेचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष

प्रस्तावित गावांमध्ये नागरीकरण वाढत असून, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, रस्ते, पावसाळी पाण्याचा निचरा, घनकचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांची गरजही वाढत आहे. ग्रामपंचायतींना वाढत्या नागरीकरणानुसार या सुविधा पुरविणे कठीण होत असल्याचे महापालिकेच्या प्रस्तावात नमूद आहे. या गावांचा समावेश झाल्यास नागरी सुविधांचे एकात्मिक नियोजन, विकासकामांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण अधिक सुसूत्रपणे करता येईल, असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. परंतू जी २९ गावे यापूर्वीच पनवेल महापलिकेत समाविष्ट आहेत त्यांनाही महापालिकेने पिण्याचे पाणी आणि स्मशानभूमीसारख्या पायाभूत सुविधा स्थापनेच्या १० वर्षे झाल्यानंतरही पुरवू शकल्या नाहीत. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या विशेष सभेत लोकप्रतिनिधी या विस्ताराबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे