पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल परिसरातील युवक-युवतींसाठी निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन पनवेल महापालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विमानतळ तसेच विमानतळाशी संलग्न उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना नोकरी मिळावी, यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण मोफत देण्याच्या उद्देशाने महापालिकेने प्रशिक्षण व रोजगार देणाऱ्या संस्थांसाठी स्वारस्य निविदा जाहीर केली आहे.
महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या तरुणांना रोजगारासाठी कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देणारी पनवेल ही पहिली महापालिका असेल. महापालिकेने सुमारे ३ हजार उमेदवारांना विविध कौशल्य कुशलतेचे प्रशिक्षणासाठी ७ ते ८ कोटी रूपये खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पनवेल महापालिका क्षेत्रालगत उभारण्यात आल्याने येथे शेकडो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ही संधी स्थानिक तरुणांनीच मिळवावी, या हेतूने महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पुढाकार घेतला आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला सुमारे तीन हजार युवक-युवतींनी नोंदणी केली होती. यापैकी ८७२ उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. त्यानंतर आयुक्तांनी विमानतळाचे संचलन करणाऱ्या अदानी उद्योग समूहाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून विमानतळात उपलब्ध होणाऱ्या रोजगारांची माहिती घेतली.

या चर्चेनंतर विमानतळ व सलग्न उद्योगांमध्ये तब्बल १४ प्रकारच्या कामांसाठी प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार या कामांसाठी आवश्यक अद्ययावत कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची निवड करण्यासाठी बुधवारी स्वारस्य निविदा जाहीर करण्यात आली आहे.

महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांच्या अखत्यारित असणाऱ्या समाज विकास विभागामार्फत बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेनुसार, पनवेल महापालिका क्षेत्रातील स्थानिक युवक-युवतींना विमानतळाशी संबंधित मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या स्वारस्य निविदेत इच्छुक संस्था २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत त्यांची नोंदणी करू शकतील.

सध्या प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधींच्या हाती कारभार आल्याने महापालिकेचे महापौर नितीन पाटील व नगरसेवकांनी या योजनेची युवकांमध्ये प्रभावी जनजागृती करणे आवश्यक ठरणार आहे. योग्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना विमानतळातील रोजगाराच्या संधी मिळाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात बारावीपासून पदविका आणि इतर शैक्षणिक पात्र उमेदवारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण महापालिका देण्याचे नियोजन आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होत आहे. मागील वर्षी भव्य रोजगार मेळाव्यातील उमेदवारांच्या प्रतिसादानंतर महापालिका क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ असावे यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकडून स्वारस्य निविदा मागविल्या आहेत.

  • मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका
  • प्रशिक्षणासाठी ७ ते ८ कोटी रूपये खर्च करण्याची पालिकेची तयारी
  • १४ प्रकारच्या कामांसाठी प्रशिक्षित, कुशल मनुष्यबळाची आवश्यकता
  • किमान बारावी उत्तीर्ण असलेल्या स्थानिक उमेदवारांना प्रशिक्षण
  • इच्छुक संस्थांना निविदेच्या नोंदणीसाठी ५ मार्चपर्यंत मुदत