पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या अंतरावर उभारण्यात येत असलेले पनवेल महापालिकेचे नवे मुख्यालयाचे काम नियोजनातील गोंधळामुळे रखडले असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेल्या या कामाच्या आरेखनात वारंवार करण्यात आलेले बदल, ठेकेदाराचे आर्थिक आघाडीवर फसलेले नियोजन आणि अर्थ नियोजनातील सावळागोंधळामुळे या संपूर्ण प्रकल्पाचे वेळापत्रकच कोलमडून पडल्याचे आता स्पष्ट होत आहे. पनवेलचे महापौर नितीन पाटील यांनीही लोकसत्ताशी बोलताना यामागची कारणे स्पष्ट केली आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर पनवेल-रायगड परिसरातील बांधकाम आणि नागरी विकासाला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नवी मुंबई महापालिकेने आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उत्तरेकडील बाजूस उभारलेले मुख्यालय गेल्या काही वर्षापासून सातत्याने चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेसे विमानतळापासून काही अंतरावर पनवेल-शीव महामार्गास लागून मोठा गाजावाजा करत ‘स्वराज्य’ नामक मुख्यालयाचे काम काही वर्षांपुर्वी हाती घेतले. साधारणपणे ३० महिन्यांच्या मुदतीत मुख्यालयाचे काम पुर्ण होईल असे दावे करण्यात आले. असे असताना या प्रकल्पाच्या कामासाठी आतापर्यंत सतत मुदतवाढीची श्रृंखला सुरू असल्याचे चित्र आहे. मोठ्या प्रमाणात झालेली खर्चवाढ, बँक हमीच्या मुदतीचा प्रश्न, विमा संरक्षणातील खंड, कामगार सुरक्षेबाबतच्या नोटिसा आणि पर्यावरणीय अनुपालनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे महापालिका उभारत असलेला सरकारी प्रकल्पातील नियोजन आणि देखरेखीच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेमकी स्थिती काय ?

माहिती अधिकार कार्यकर्ते सूहास वानखेडे यांनी मिळवलेल्या माहितीप्रमाणे नवीन पनवेल, सेक्टर १६ येथील भूखंड क्रमांक ४ वर प्रशासकीय मुख्यालयाच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आली होती. या कामाची अंदाजित मूळ किंमत जीएसटी वगळता ११० कोटी ७७ लाख ७५ हजार ७३६ रुपये होती. निविदेतील कामाचा कालावधी ३० महिने निश्चित करण्यात आला होता. वाटाघाटीनंतर सुमारे ११२ कोटी ९२ लाख ५९ हजार ९८५ रुपये इतक्या रकमेला काम मंजूर करून २९ एप्रिल २०२२ रोजी मे. हर्ष कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड यांना कार्यादेश देण्यात आला. मूळ पूर्णत्वाची तारीख १ नोव्हेंबर २०२४ होती. प्रशासकीय राजवटीत या मुख्यालयाचे आरेखन आणि कामाचा दर्जा याविषयी सातत्याने वेगवेगळे दावे केले गेले. प्रत्यक्षात मात्र या दाव्यांमधील फोलपणा आता उघड होऊ लागला आहे. या कामाला मुदतवाढीची मालिका सुरू झाली. या कामाला पहिली मुदतवाढ ३० एप्रिल २०२५ पर्यंत, त्यानंतर १ ऑक्टोबर २०२५पर्यंत आणि पुढे ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढीची प्रक्रिया करण्यात आली. या तीन वेळच्या मुदतवाढींमध्ये प्रकल्पाच्या खर्चात दरवाढ करण्यात आली. प्रत्येक विलंबामागील कारण, त्याची जबाबदारी कोणाची, विलंब टाळण्यासाठी कोणते प्रयत्न झाले आणि संबंधित कालावधीसाठी दरवाढ देणे नियमाने ग्राह्य होते का, याची स्पष्ट नोंद आवश्यक असल्याचा आक्षेप माहिती अधिकार कार्यकर्ते वानखेडे यांनी उपस्थित केला आहे.

प्रकल्पात ४३ टक्के खर्चवाढ …

कामाच्या मुदतवाढीतील तपशीलानुसार मूळ कार्यादेशाची रक्कम जीएसटीवगळता ११२ कोटी ९२ लाख ५९ हजार ९८५ रुपये होती. सुधारित रक्कम १६१ कोटी ४९ लाख ११ हजार ६३ रुपये, तर जीएसटीसह ती सुमारे १९० कोटी ५५ लाख ९५ हजार ५४ रुपये झाली आहे. मूळ कार्यादेशाच्या तुलनेत ४८ कोटी ५६ लाख ५१ हजार ७७ रुपयांची म्हणजेच ४३.०१ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. या खर्चवाढीचे कारण केवळ दरवाढ नसून अतिरिक्त कामे, वाढीव प्रमाणातील काम, आराखड्यातील बदल, पायाभरणीतील बदल, स्टील व लोखंडातील बदल, वगळलेल्या कामांची वजावट आणि जीएसटी अशा विविध घटकांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक घटकाची स्वतंत्र तपासणी करून त्याची आवश्यकता, दर आणि मंजुरीची प्रक्रिया तपासणे गरजेचे असल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे. मुळ निवीदा प्रक्रिया राबवित असताना या सर्व बाबींचा विचार का करण्यात आला नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

प्रकल्पाच्या विलंबासाठी जमिनीचा प्रश्न कारणीभूत असल्याचेही नोंदीतून स्पष्ट होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. महापालिकेने सिडकोला मोबदला देऊन १९ एप्रिल २०२१ रोजी भाडेपट्टा करार केला आणि भूखंडाचा ताबा घेतला होता. त्यानंतर ७ सप्टेंबर २०२१ रोजी विकास परवानगी मिळाली. त्यामुळे जमीन उपलब्ध नसणे किंवा प्रारंभीची विकास परवानगी प्रलंबित असणे, अशी परिस्थिती या प्रकल्पाच्या सुरुवातीला नव्हती.

माती, भूस्तर आणि पायाभरणीशी संबंधित अतिरिक्त कामांबाबतही स्वतंत्र तपासणीची मागणी करण्यात आली. निविदेपूर्वीच्या कागदपत्रांनुसार यशस्वी कंत्राटदाराने काम सुरू करण्यापूर्वी नव्याने माती तपासणी करणे अपेक्षित होते. त्यानंतरच्या मुदतवाढीच्या नोंदींमध्ये अपेक्षेपेक्षा सुमारे दीड मीटर खाली भूस्तर आढळल्याने उत्खनन, संरक्षक भिंती, पायाभरणी आणि आराखड्यात बदल करावे लागल्याचे नमूद आहे. ही परिस्थिती प्रत्यक्षात अनपेक्षित होती का, याची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्याची मागणी होत आहे.

जबाबदार कोण ?

प्रकल्पासाठीच्या बँक हमी, विमा संरक्षण, कामगार सुरक्षा, पर्यावरणीय नियमांचे पालन आणि स्वतंत्र गुणवत्ता तपासणी याबाबतची कागदपत्रेही सातत्याने अद्ययावत ठेवली गेली का, याची चौकशी करण्याच्या मागणीसोबत प्रकल्पासाठी स्वतंत्र तांत्रिक, आर्थिक आणि पर्यावरणीय देखरेख ठेवून उर्वरित काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे, तसेच विलंबासाठी जबाबदार व्यक्ती किंवा संस्थेची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

पनवेल महापालिका मुख्यालय स्वराज्य या इमारतीच्या मूळ आरेखना मध्ये झालेले काही बदल त्यामुळे किंमत वाढली. दुसरा टप्पा ठेकेदाराने निविदा नीट अभ्यास न करता मूळ रकमेच्या -७% दराने भरली , प्रत्यक्षात काम करताना त्यामुळे अडचण झाली व काम ५% पेक्षा पुढे करू शकले नाहीत.- नितिन पाटील, महापौर, पनवेल महापालिका