पनवेल : मुंबई महानगर क्षेत्रातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेलमध्ये उभारल्याने शहराच्या विकासाला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने २०१९ मध्ये पुढील २० वर्षांचा शहर विकास आराखडा (सीडीपी) बनवला होता. या आराखड्यानुसार साडेचार हजार कोटी रुपयांची विकासकामे करण्याचे नियोजन करण्यात आले. या नियोजित कामांपैकी महापालिकेने ४० टक्के कामांचे ध्येय गाठले आहे.
पुढील वर्षात यातील ६० टक्के कामे हाती घेण्याचा महापालिका प्रशासनाचा मानस आहे. दरम्यान, सहा वर्षांपूर्वी पनवेलच्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळण्यासाठी महापालिकेने तब्बल १९०० कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. पनवेल शहराची वाढती लोकसंख्या, विमानतळामुळे वाढणारी वर्दळ आणि आसपासच्या भागांचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेता हा आराखडा पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल महापालिका क्षेत्राला लागून असल्याने शहराची ओळख जागतिक पातळीवर पोहोचली आहे.
महापालिका क्षेत्रातील २९ गावे तसेच सिडकोच्या सात वसाहतींना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा पुरविणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. सिडकोने महापालिकेच्या पूर्वेला ‘नैना’ प्रकल्पांतही सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची आखणी केली आहे. या दरम्यान पनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २०१९ साली शहराचा पुढील २० वर्षांसाठीचा म्हणजे २०४१ पर्यंतचा शहर विकास आराखडा (सीडीपी) बनविण्यात आला.
या सीडीपीनुसार आतापर्यंत सर्वात मोठा खर्च घनकचरा व्यवस्थापनासाठी ६३७ कोटी रूपये करण्यात आले आहेत. रस्ते बांधकामासाठी तब्बल ४९९ कोटी रूपये खर्च केले आहेत. तसेच पाणी समस्या सुटण्यासाठी महापालिकेने २८५ कोटी रूपये खर्च केले आहेत. गावांगावातील आणि शहरातील पथदिव्यांसाठी महापालिकेने २१३ कोटी रूपये खर्च केले आहेत.
पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ४,५०८ कोटी रुपयांची विकासकामे सीडीपीमध्ये २० वर्षांचा काळ ध्यानात घेऊन सुचविण्यात आली होती. त्यापैकी १९२२ कोटी रुपयांची म्हणजे ४० टक्के कामांचे ध्येय गाठले असून उर्वरित २,५८६ कोटींच्या कामांची अंमलबजावणीची प्रक्रिया महापालिकेची सुरू आहे.
कोट
पनवेल महापालिकेने नियोजित केलेल्या सीडीपीनुसार विकासकामे सुरू आहेत. स्मार्ट, शाश्वत आणि संतुलित पनवेल शहर बनविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. -मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका.
पूर्ण झालेली आणि सुरू असलेली कामे (कोटी रुपयांमध्ये)
पाणी पुरवठा २८५
मल:निसारण १०७
पावसाळी गटार ३३
घनकचरा व्यवस्थापन ६३७
रस्ते बांधकाम ४९९
पथदिवे २१३
आरोग्य ६४
शिक्षण – ८१
