पनवेल : प्रेक्षक गॅलरीत नागरिकांनी टाळ्या वाजवल्याच्या घटनेवरून पनवेल महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंगळवारी मोठा वाद निर्माण झाला. नागरिकांची बाजू मांडणारे शेकापचे नगरसेवक प्रकाश म्हात्रे यांनाच महापौर नितीन पाटील यांनी एका सभेसाठी निलंबित केले. त्यानंतर म्हात्रे यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईला विरोध करीत महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सभात्याग केला. मंगळवारी (ता.२) आद्यक्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही सभा सुरू होती. 

या सभेत गव्हाण आणि वडघर जिल्हा परिषद गटांचा महापालिकेत समावेश करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना शिवसेनेच्या (ठाकरे गट) नगरसेविका लीना गरड यांनी महापालिकेतील नागरी सुविधांच्या उणिवांवर भाष्य केले. त्यांच्या वक्तव्याला फडके नाट्यगृहाच्या प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला. यामुळे महापौरांनी संबंधित नागरिकांना गॅलरीबाहेर काढण्याच्या सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या.

सुरुवातीला हे नागरिक लीना गरड यांचे समर्थक असल्याचा महापौरांचा समज झाला. मात्र, ते अन्य कामासाठी गॅलरीत उपस्थित असल्याचे प्रकाश म्हात्रे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. नागरिकांना बाहेर काढू नये, अशी विनंतीही त्यांनी केली. मात्र, महापौरांनी म्हात्रे यांना एका सभेसाठी निलंबित केले.

या निर्णयानंतर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. महाविकास आघाडीचे नगरसेवक केतन भगत आणि लतिफ शेख यांनीही महापौरांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. मात्र, म्हात्रे यांनी सभागृह सोडले नाही तर पुढील तीन सभांसाठी निलंबित करण्याचा इशारा महापौरांनी दिला. त्यानंतर सुरक्षारक्षकांना म्हात्रे यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईच्या निषेधार्थ विरोधी गटातील सर्व सदस्यांनी सभागृहाचा त्याग केला.