पनवेल – पनवेल महानगरपालिकेतील सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीबाबत सुरू असलेल्या राजकीय तिढ्याला अखेर सोमवारी पूर्णविराम मिळाला. महापौर नितीन पाटील यांच्या पुढाकाराने भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बिनेदार यांना सभागृह नेतेपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला, तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अरविंद पाटील यांच्या नावावर विरोधी पक्षनेतेपदासाठी शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे महापौर पाटील यांनी स्वताचे अधिकार वापरून महापालिकेचे विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेते पदाची नियुक्ती पत्राने नेमणूक जाहीर केले. 

पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या महासभेत स्वीकृत सदस्यांची नियुक्ती पूर्ण झाली होती. मात्र सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते या दोन महत्त्वाच्या पदांच्या नियुक्त्या प्रलंबित असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. कोणत्या सदस्यांना ही पदे मिळणार याबाबत विविध तर्कवितर्क सुरू होते.

दरम्यान, सोमवारी महापौर नितीन पाटील यांच्या एका फोननंतर या प्रक्रियेला गती मिळाली. पूर्वनियोजनानुसार विरोधी पक्षनेते पद शेतकरी कामगार पक्षाच्या वाट्याला देण्याचे ठरले होते. मात्र भारतीय जनता पक्षाकडून सभागृह नेतेपदासाठी कोणाचे नाव निश्चित करायचे यावर एकमत होत नसल्याने निर्णय रखडला होता.अखेर आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपचे अनुभवी नगरसेवक तथा भाजपचे प्रवक्ता प्रकाश बिनेदार यांच्याकडे सभागृह नेतेपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला. बिनेदार यांच्या नावावर एकमत झाल्यावर लागलीच भाजपने विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवला. महापौर नितीन पाटील यांनी विरोधी गटाचे गटनेत्यांना फोन करून शेकापच्या गटाकडून दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या.

यानुसार शेकापच्या १३ नगरसेवकांनी अरविंद पाटील यांच्या नावाचा विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर महापौर पाटील यांनी त्यांची नियुक्तीपत्राने अधिकृत घोषणा केली. यापूर्वी महासभेच्या विषयांमध्ये विरोधी पक्षनेतेपदाचा विषय पटलावर न घेतल्याने अरविंद पाटील यांनी महापौर आणि महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याची भूमिका घेतली. मात्र न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच महापौरांनी या वादावर पडदा टाकत दोन्ही पदांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेला चालना दिली.दरम्यान, पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निवडीसाठी बुधवारी (ता. १८) विशेष सभा बोलावण्यात आल्या आहेत. या दोन्ही समित्यांची निवड प्रक्रिया पनवेल शहरातील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार आहे.