पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित ७८ नगरसेवकांना प्रथमच आधुनिक टॅबलेट (संगणक) तसेच महापालिका अधिनियमांचे मार्गदर्शक पुस्तक देण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनात सुरू आहेत. या टॅबलेटच्या माध्यमातून नगरसेवकांनी महापालिकेचा दैनंदिन कारभार हाताळावा, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. नुकत्याच ई-गव्हर्नन्समध्ये राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पनवेलने प्रथम क्रमांक पटकावत आपली डिजिटल क्षमता अधोरेखित केली आहे.

सध्या महापालिकेत ई-ऑफीस प्रणालीद्वारे कामकाज सुरू असून आयुक्त चितळे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम कारभार पेपरलेस करण्यावर भर दिला. त्यानुसार अधिकारी व कर्मचारी ई-ऑफीसवर काम करत आहेत. याच धर्तीवर नगरसेवकांनीही त्यांच्या तक्रारी, सूचना व पत्रव्यवहार टॅबवरून ई-मेलद्वारे केल्यास प्रशासनाकडून तातडीने त्यास प्रतिसाद देता येईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.

२०१६ साली महापालिका स्थापन झाल्यानंतर २०१७ मधील पहिल्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांना अशी सुविधा दिली नव्हती. मात्र आता प्रत्येक प्रभागातील २० ते ३५ हजार मतदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांना थेट महापालिकेच्या संकेतस्थळावर नोंदविलेल्या नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा किती वेळेत होतो, यावर देखरेख ठेवता येणार आहे. यामुळे सेवाहमी नियमांचे पालन होते की नाही, यावरही नियंत्रण मिळणार आहे.

१० फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर निवडीनंतर होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांना टॅबलेट उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.

प्रशासकीय गतिमानता, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी ई-गव्हर्नन्सचा वापर करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना टॅब देण्यात येणार आहेत, ज्यामुळे नागरिकांना जलद सेवा आणि तात्काळ समस्या निवारण होईल. – मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका