पनवेल महापालिकेने पावसाळ्यानंतरची रस्त्यांची बिकट अवस्था आणि वाढत्या सार्वजनिक टीकेच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत. गुणवत्ता, समन्वय आणि गती या तिन्ही बाबींवर भर देत महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष स्थळांवर अनपेक्षित भेटी देत आहेत. यामुळे येत्या पंधरावड्यात महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष्य नियंत्रित केल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे. 

मागील तीन दिवसांपासून महापालिके अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे आणि शहर अभियंता संजय कटेकर यांनी प्रभागनिहाय रस्ते कामे सुरू असलेली वेगवेगळी ठिकाणांवर अनपेक्षित भेटींचे नियोजन केले आहे. कंत्राटदाराला माहिती न देता होणा-या या भेटींमुळे महापालिका अधिका-यांना सामान्य प्रवाशांची प्रतिक्रिया एेकायला मिळत आहे. गुरूवारनंतर पुन्हा शुक्रवारी या प्रकारच्या भेटीमध्ये शहर अभियंता संजय कटेकर यांनी खारघरमध्ये सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या प्रक्रियेची तापमानासह तांत्रिक तपासणी केली. डांबरातील घटक प्रमाण योग्य आहे का, हेही त्यांनी तपासले.

तसेच कामोठे येथील कामाच्या स्थळी जाऊन रस्ता नव्याने केल्यानंतर महानगर गॅस, पाणीपुरवठा यांसारख्या इतर विभागांच्या वाहिन्यांसाठी पुन्हा खोदाई होऊ नये, यासाठी ‘सर्व विभागांमध्ये समन्वय घालूनच कामे करा,’ अशी कडक सूचना त्यांनी दिली.पावसाळ्यात नवीन रस्त्यांवर खड्ड्यांचा लोंढा वाढल्याने महापालिकेवर नागरिक, सामाजिक संघटना आणि विरोधकांनी प्रचंड टीका केली होती.

कंत्राटदार हे राजकीय पक्षांच्या निकवर्तीय असल्याचे आरोप झाले. समाजमाध्यमांवरील व्हिडिओंनी महापालिकेच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले.या पार्श्वभूमीवर आयुक्त मंगेश चितळे यांनी सर्व कंत्राटदारांना नोटिसा देत गुणवत्तेवर तडजोड न करण्याची भूमिका घेतली. तसेच ‘नवीन रस्ते इतक्या लवकर का खराब झाले?’ याचा छडा लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चौकशी समितीची स्थापना केली. अद्याप या समितीने त्यांचा अहवाल दिलेला नाही. आयुक्तांच्या सूचनेनंतर कंत्राटदारांनी दुरुस्तीची कामे पुन्हा सुरू केली असून अधिकारी प्रत्यक्ष स्थळी अचानक भेटी देत गुणवत्ता तपासत आहेत.दरम्यान, खारघर सेक्टर १३ मधील कामधेनू मार्ग, रघूनाथ विहार परिसर आदी ठिकाणी अतिरीक्त आयुक्त शेटे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांना वेग देण्याच्या सूचना दिल्या.

तळोजा, नवीन पनवेल, खारघर, कामोठे यांसह चारही प्रभागांत रस्ते दुरुस्तीची कामे जोरात सुरू आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंते कार्यरत असून हिवाळ्यातही रस्त्यांवर डांबराची कलई पुन्हा चढत आहे. महापालिकेचे हे प्रयत्न पाहता, आगामी महिन्यांत पनवेलमधील प्रमुख रस्ते दणकट राहतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.