पनवेल – पनवेल महापालिकेच्या राजकारणात निर्णायक ठरणारी सर्वसाधारण सभा येत्या ६ मार्च रोजी होणार असून, या सभेत स्थायी समिती सदस्यांची निवड, महिला व बालकल्याण समितीची रचना तसेच सात नामनिर्देशित (स्विकृत) नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)च्या सदस्यांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे पनवेलमधील महाविकास आघाडीची फक्त विकास आघाडीच राहीली. ६ मार्चच्या बैठकीत भाजप, शेकाप स्विकृत व स्थायी समितीचे नेतृत्व कोणाच्या हाती देणार हे ठरणार आहे.
पनवेल महापालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा ६ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता शहरातील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली आहे. महापालिकेचे सचिव नानासाहेब कामठे यांनी बुधवारी जाहीर केलेल्या विषयपत्रिकेनुसार, या सभेत तीन महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. सर्वप्रथम स्थायी समितीच्या रचनेनुसार १६ सदस्यांची निवड केली जाईल. त्यानंतर महिला व बालकल्याण समितीचे सदस्य निश्चित करण्यात येतील.
याचबरोबर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या सात नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्तीही याच सभेत होणार आहे. पनवेल महापालिकेच्या ७८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला ५९ जागांवर यश मिळाले असून एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्या आघाडीला १८ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
निवडणुकीपूर्वी भाजप महायुती विरुद्ध शेकाप महाविकास आघाडी असे पनवेलमध्ये चित्र होते. मात्र निवडणुकीनंतर शिवसेनेचे (ठाकरे गट) पाच सदस्य निवडूण आल्याने या नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून महापालिका आयुक्तांची भेट घेत स्वतंत्र दालनाची मागणी केली. यामुळे त्यांनी महाविकास आघाडीपासून वेगळी वाटचाल करण्याचा इशारा ठाकरे सेनेच्या सदस्यांनी दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे महापालिका सदस्यांनी महाविकास आघाडीच्या गटस्थापना केली असती तर त्यांना महाविकास आघाडीचे सर्व निर्णय शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील हेच घेत असल्याने शेकाप व कॉंग्रेस सांगेल त्यांना स्विकृत नगरसेवकाची संधी द्यावी लागली असती. मात्र बाळाराम पाटील व कॉंग्रेसच्या नेत्यांचे नेतृत्व नको या कारणामुळे शिवसेनेनी (ठाकरे गट) पनवेलमध्ये स्वतंत्र भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीत शिवसेनेच्या (ठाकरे गट) गटाला पक्षबांधणी करण्यासाठी महाविकास आघाडीसोबत न राहता शिवसेनेनी स्वतंत्र वाटचाल करण्याची आखणी केली आहे. मात्र तीनही गटाकडून अद्याप स्विकृत नगरसेवकांच्या नियुक्तीत कोणता पक्ष कोणाची नावे पुढे करतो हे अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे. या पार्श्वभूमीवर, ६ मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित नगरसेवकांच्या नियुक्तीवर या राजकीय हालचालींचे स्पष्ट पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्विकृत व स्थायी समितीतील नावे कोणता राजकीय पक्ष ठरविणार
स्विकृत व स्थायी समितीतील सदस्यांची नियुक्ती ही सभागृहातील निवडूण आलेल्या संख्याबळानूसार होणार आहे. सध्या पनवेल महापालिकेत तीन गटाची वेगवेगळी स्थापना झाली आहे. यामध्ये भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील ५९ सदस्यांचा एक गट, शेकाप व कॉंग्रेस आघाडीतील १३ सदस्यांचा दूसरा गट आणि शिवसेना (ठाकरे गट) पाच सदस्यांचा तीसरा गट आहे.
तौल्निक संख्याबळानूसार ७८ सदस्यांसाठी सात नामनिर्देशित सदस्यांसाठी भाजप महायुतीच्या ५९ सदस्यांना पाच तर शेकाप व कॉंग्रेसच्या गटाला एक आणि ठाकरे गटाला १ असे स्विकृत सदस्य नियुक्त करण्याचे भाजप महायुतीचे ५९ नगरविकास नगरसेवक असल्याने सभागृहात भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक नियुक्त केले जातील.
तसेच विकास आघाडीतील शेकाप व कॉंग्रेसच्या वाटेला १३ सदस्यांनी गट स्थापन केल्यामुळे त्यांच्या वाटेला एक आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) पाच सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याने त्यांच्या वाटेला एक असे एकुण सात स्विकृत नगरसेवक नियुक्त करण्याची संधी राजकीय पक्षांना मिळणार आहे. अशीच सदस्य रचना स्थायी समितीच्या नियुक्ती प्रक्रियेत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्थायी समितीचे १६ सदस्यांची नियुक्तीमध्ये भाजप महाविकास आघाडीला १६ पैकी १२ सदस्य तसेच शेकाप व कॉंग्रेस आघाडीला ३ तर शिवसेनेला (ठाकरे गट) एक सदस्य नियुक्त करण्याची संधी मिळणार आहे.

