पनवेल : महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून महापालिका टँकर खरेदी करण्याच्या तयारीत आहे. पाणीपुरवठा विभागाने १० हजार लिटर क्षमतेचे २० नवीन टँकर खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला असून त्यासाठी ९ कोटी ५९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सिडकोकडून २८ टँकरद्वारे दररोज सुमारे २४९ फेऱ्या, तर महापालिकेकडून भाडेतत्त्वावरील १० टँकरद्वारे सुमारे ५० फेऱ्या केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे आणि महापौर नितीन पाटील यांच्या पाठपुराव्यातून हा प्रस्ताव बनविण्यात आला आहे. आगामी महासभेत नगरसेवक या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेणार आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रातील गावे, पाडे तसेच सिडको नोडमध्ये पाणीटंचाई किंवा पाणीपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांकडून टँकरची मागणी केली जाते. महापालिका मालमत्ता कर वसुल करते त्यामुळे पाण्यासारखी मुबलक गरज महापालिकेनेच भागवावी, अशी मागणी रहिवाशांकडून सातत्याने होत आहे. महापालिका क्षेत्रातील पाण्याची मागणी आणि उपलब्ध पुरवठा यामध्ये दररोज ३५ दशलक्ष लिटरची तूट आहे. उन्हाळ्यात टँकरची मागणी वाढत असताना भाडेतत्त्वावर टँकर पुरविणाऱ्या कंत्राटदारांकडून आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

सिडको मंडळाकडून खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेल या उपनगरांमध्ये २८ टँकर भाड्याने घेण्यात आले आहेत. या टँकरद्वारे दररोज सुमारे २४९ फेऱ्या करून पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे, पनवेल महापालिका सध्या १० टँकर भाड्याने घेऊन ५० फेऱ्यांच्या माध्यमातून गावठाण क्षेत्रात पाणीपुरवठा करत आहे. विशेष म्हणजे दोन्ही सरकारी प्रशासनाकडे एकाच कंपनीकडून टँकर भाड्याने देण्याचे काम होत आहे. त्यामुळे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भाड्यावर लाखो रूपये खर्च करण्यापेक्षा स्वतःच्या मालकीचे टँकर असावेत, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

एलनिनोच्या सावटामुळे आत्ताच पनवेल महापालिकेला पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. अद्याप पनवेल शहरामध्ये पाणी कपात लागू केली नसली तरी पाण्याच्या नियोजनाची पाऊले उचलावी लागणार आहेत. पाण्याची सद्यस्थिती, भविष्यातील मागणी, पाण्याची काटकसर आणि पाण्याचा अपव्यय करणाऱ्या व्यावसायिकांवर निर्बंध घालावे लागतील. यासाठी सर्वच नगरसेवक, विविध सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी यांच्यापर्यंत पाणी नियोजनाची माहितीसाठी बैठका घ्याव्या लागतील. तसेच महापालिकेला समाजमाध्यमांव्दारे तसेच घरोघऱी जाऊन याची जनजागृती करावी लागेल, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

निविदा प्रक्रिया लवकरच

महापालिकेने बाजारभाव मागविल्यानंतर तीन दरपत्रके प्राप्त झाली. यासाठी महापालिकेने साडेनऊ कोटी रुपये टँकर खरेदीसाठी तरतूद केली आहे. महासभेची किती टँकर खरेदीला मंजुरी मिळते याकडे पनवेलकरांचे लक्ष्य लागले आहे. महासभेच्या मंजुरीनंतरच ई-निविदेद्वारे टँकर खरेदीची प्रक्रिया सुरू होणार आहे.