पनवेल: पनवेल तालुक्यातील ग्रामीण पनवेलमधील ४५ गावांसह २२ आदिवासी वाड्यांतील वीजपुरवठ्याचा प्रश्न अद्याप कायम असून नेरे येथील महालक्ष्मी उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरू झाल्यानंतरही नागरिकांना वारंवार खंडित व कमी दाबाच्या विजेचा सामना करावा लागत आहे. उपकेंद्राच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत असून, संबंधित ठेकेदाराविरोधात सरकारच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केली आहे.  

११ मे रोजी पनवेलमध्ये यंदाचे सर्वाधिक तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस भारतीय हवामान विभागाकडे नोंदवले गेले. उन्हाळ्याच्या चढत्या पा-यामध्ये ग्रामीण पनवेल तापले असताना घरात विज नसणे हे नित्याचे झाले आहे.  ग्रामीण पनवेलमधील नेरे फीडरवर सुमारे ३२ हजार वीज ग्राहक अवलंबून आहेत. महिन्याला सूमारे पावणेचार कोटी रूपयांचे वीज देयक येथील ३२ हजार विजग्राहकांकडून वसुल केले जाते. मात्र त्या विजग्राहकांना बेभरवशाची विज पुरवठा केला जातो. या परिसरातील वीज समस्येवर उपाय म्हणून २०१४ मध्ये नेरे येथे १० एमव्हीए क्षमतेचे उपकेंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते.

९ किलोमीटरवरून दोन विज वाहिन्या नेरे उपकेंद्रापर्यंत आणण्यात आल्या. परंतू सरकारी काम आणि १२ वर्षे थांब, या उक्तीप्रमाणे या उपकेंद्राचे काम रखडले. भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांनीही वीज महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांची वारंवार बैठका घेतल्यानंतरही या कामाला फारशी गती मिळू शकली नाही. हे काम करणारे कंत्राटदार दोन वेळा बदलले. त्यानंतर मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात या उपकेंद्राचे काम सुरू करण्याची तयारी करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात काम अपुर्ण असल्याने उद्घाटनाचा मुहूर्त टळला. 

काही दिवसांपूर्वी हे उपकेंद्र सुरू करण्याची काम हाती घेतल्यावर वीज अभियंत्यांना धक्का बसला. ९ किलोमीटरवरून आणलेल्या दोन वीज वाहिन्यांमध्ये सूमारे १२ ते १४ ठिकाणी विजेच्या जोडण्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे उघड झाले. पुन्हा महावितरणने या वीज जोडण्या नव्याने लावल्या. त्यानंतर उपकेंद्रातही हलक्या दर्जाचे साहीत्य वाटप झाल्याचे समोर आले. या सर्व वीज साहीत्यामधील गोंधळामुळे नव्या उपकेंद्रातून सुरू झालेली वीज वारंवार गुल झाली. विशेष म्हणजे ९ किलोमीटर लांबीच्या अंतरावर भूमिगत वीजवाहिनी किमान एक मीटर खोलीवर भूमिगत करण्याचे काम असतानाही अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांचे वेटोळे जमीनीवर अंतरलेले दिसतात. त्यामुळे संबंधित कंत्राटदार कंपनीचे कामाचे बील देण्यास ग्रामस्थांकडून विरोध होत आहे.

आतापर्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्यावर संबंधित कंत्राटदार कंपनीला ८० टक्के कामाची रक्कम देण्यात आली. त्यामुळे हलक्या व निकृष्ट दर्जाचे काम केल्यावर संबंधित कामाचे बील मंजूर करणा-या अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली होती का असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.         
कमी दाबाने आणि वारंवार खंडित होणारा पुरवठा आणि अचानक वीज गायब होणे या समस्या कायम असल्याने ग्रामीण पनवेलचे वीज ग्राहक वैतागले आहेत. विजेच्या चढ-उतारामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होत शेकडो ग्रामस्थांना स्टॅबिलायझर लावण्याचा खर्च करावा लागतो. 
पनवेल वीज महावितरणच्या अधिका-यांनी निकृष्ट काम कऱणा-या एजन्सी मेसर्स एस. टी. इलेक्ट्रिकल यांनी जाणीवपूर्वक निकृष्ट व कमी क्षमतेचे साहित्य वापरल्याने त्यांचे पुढील काम होईपर्यंत बील रोखून धरावे अशी लेखी मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे. मात्र संबंधित एजन्सीवर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदविण्याबाबत वीज महावितरण कंपनीने मौन बाळगले आहे. 

विशेष म्हणजे राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्रात म्हणजे (नैना) वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण पनवेलचे नियोजन केल्याचा दावा केला असला तरी अखंडीत विजेसारखी पायाभूत सुविधा सुद्धा सरकार या परिसरात पुरवू शकत नसल्याने सरकारचा दावा फोल ठरत आहे. यामुळे ग्रामीण पनवेलमधील निवासी क्षेत्र, उद्योग आणि व्यापाराला चालना कशी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे.

ग्रामीण पनवेलमध्ये सर्वच विज ग्राहकांना अखंडीत विज पुरवठा करणे हे वीज महावितरण कंपनीचे काम आहे. नेरे उपकेंद्र उभारण्यासाठी ज्या कंत्राटदार कंपनीने हे काम अर्धवट सोडले आणि ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहे.

  •  प्रशांत ठाकूर, आमदार, भाजप

महावितरण कंपनीचे प्राधान्य हे नेरे उपकेंद्राचे काम पुर्ण करण्यासाठी होते. उपकेंद्र सुरू केले असून दोन फीडर सुरू केले आहे. काही दुरूस्तीची किरकोळ कामे आहेत. पुढील आठ ते दहा दिवसात सर्व दुरूस्तीचे काम पुर्ण करण्याचे महावितरण कंपनीने नियोजन केले आहे.  ज्या कंत्राटदार कंपनीने कामात हलगर्जीपणा केलाय त्यांना दंड सुद्धा आकारण्याची कार्यवाही केली आहे. मात्र संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करण्यासोबत त्यांच्याकडूनच उर्वरीत कामे करून घेणे याकडे आम्ही लक्ष्य केंद्रीत केले आहे.

  • जितेंद्र माने, कार्यकारी अभियंता, वीज महावितरण कंपनी, पनवेल