पनवेल : मुंबई गोवा महामार्गावरील पळस्पे फाटाजवळील ओशियन गेट पार्किंग कंपाऊंडजवळ बुधवारी (७ मे) सायंकाळी साडेचार वाजता सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील १२७९ गोणी तांदळाने भरलेला ट्रक पनवेलच्या पुरवठा अधिकाऱ्यांनी पनवेल शहर पोलिसांच्या मदतीने पकडला. हा तांदळाचा साठा खालापूर येथील जय आनंद फुड इंडस्ट्रीज कंपनीचा असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.

गरीब नागरिकांच्या हक्काचा तांदूळ परदेशात पाठविण्यासाठी पनवेल येथे आणणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी अश्विनी धनवे यांना मिळाली होती. पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांसह धनवे यांनी सापळा रचला. पळस्पे येथील ओशियन गेट पार्किंग कंपाऊंड येथे एक ट्रक पोलीस पथकाला सापडला. मात्र तांदळाने भरलेला दुसरा ट्रक तेथून चालकाने पळवला. ट्रकचालक शिवप्रसाद सरोज याच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने १२७९ गोणी तांदूळ साठा खालापूर येथील आनंद फूड इंडस्ट्रीजच्या मालकाचा असल्याचे सांगितले.

तस्करीसाठी पनवेल सुरक्षित ठिकाण?

जेएनपीटी बंदरमार्गे जल वाहतुकीने देशातील रेशनिंगचा तांदूळ परदेशात पाठविणारी टोळी सक्रिय आहे. पाच वर्षांपूर्वी देखील पनवेल येथील टेक केअर या कंटेनर गोदामात तांदळाचा २२२० गोणी साठा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जप्त केला होता. परदेशात तांदळाची तस्करी करून विक्रीसाठी पनवेल हे सुरक्षित ठिकाण मानले जाते.