पनवेल – पनवेलमधील राष्ट्रीय महामार्ग हे दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहेत. २ फेब्रुवारीला अशाच एका अपघातामध्ये खालापूर येथील ३८ वर्षीय आरोग्यसेवकाचा जुन्या पूणे मुंबई महामार्गावर भोकरपाडा येथे रात्री साडेआठ वाजता अपघात झाला. मृताचे नाव लक्ष्मीकांत भुसारे असे आहे. त्यांच्या नातेवाईकांनी याबाबत २७ फेब्रुवारीला पनवेल तालुका पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली.
लक्ष्मीकांत हे बेलापूर येथील सेक्टर २० मधील राणादेवी इमारतीमध्ये राहत होते. खालापूर पंचायत समितीमध्ये आरोग्यसेवक या पदावर काम करणारे लक्ष्मीकांत हे दररोज सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत घरी पोहचत असत. मात्र २ फेब्रुवारीला ते घरी न पोहचल्याने त्यांच्या पत्नी त्यांना मोबाईलवर संपर्क साधत होत्या. मात्र सुरूवातीला मोबाईलवर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर इतर व्यक्तीने लक्ष्मीकांत यांचा मोबाईलवरून प्रतिसाद देऊन अपघाताची माहिती भूसारे कुटूंबियांपर्यंत मिळाली. या दरम्यान लक्ष्मीकांत यांना कामोठे येथील महात्मा गांधी मीशन (एमजीएम) रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. लक्ष्मीकांत यांच्यावर रूग्णालयामधील अति दक्षता विभागात तीन दिवस उपचार सुरू होते. मात्र ५ फेब्रुवारीला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.
जुन्या पूणे मुंबई महामार्गावर खोपोली ते कोन फाटा या दरम्यान दुहेरी मार्ग असला तरी या महामार्गावर पथदिवे नाहीत. चारचाकी आणि अवजड वाहने या महामार्गावर सूसाट धावत असल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन दुचाकी चालवावी लागते. आरोग्यसेवक लक्ष्मीकांत भूसारे यांना देखील कोणत्या वाहनाने ठोकर दिली हे अद्याप कळू शकले नाही.
विशेष म्हणजे पनवेलमधून जाणारे पळस्पे ते पेण आणि खोपोली ते पळस्पे या दोन मुख्य महामार्गांवर पथदिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने अशापद्धतीने अनेक दुचाकीस्वारांचे प्राण घेणा-या वाहनचालकांचा शोध पोलीस लावू शकले नाहीत.
