उरण : पनवेल मधील पाडेघर नजीकच्या पळस्पे जेएनपीए राष्ट्रीय महामार्गावरील जे डब्ल्यू आर या गोदामाला शनिवारी दुपारी आग लागली आहे. ही आग अति घातक व ज्वलनशील रसायनाच्या पिंपाना लागली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे परिसरात ही रसायने पेटून स्फोटाने आगीचे डोम पसरू लागले आहेत. गोदामाच्या परिसरात आगीचे लोट निर्माण झाले असून आगीचे निश्चित कारण समजू शकलेले नाही.

ही आग विझविण्यासाठी पनवेल उरण आणि नवी मुंबईतील अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी रवाना झाली आहेत. या आगीमुळे गोदामातील लाकडी,कागदी तसेच इतर ज्वलनशील पदार्थ ही आगीच्या भक्ष्य होण्याची शक्यता आहे. आग लागल्या नंतर या गोदाम आणि परिसरात काम करणारे शेकडो कामगार सैरावैरा पळत होते.

जेएनपीए बंदराच्या आयात निर्यात होणाऱ्या मालाची साठवणूक आणि वितरण करण्यासाठी उरण व पनवेल परिसरात शेकडो गोदामांची उभारणी करण्यात आली आहे. या गोदामात ठेवण्यात येणाऱ्या मालाची सुरक्षा करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा किंवा उपाययोजना केली जात नसल्याचे अनेक आगीच्या घटनांनंतर समोर आले आहे.