नवी मुंबई : पनवेल परिसरात कमी दरात जमीन व प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवत सहा गुंतवणूकदारांची तब्बल ३० लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी ‘फार्म एन लँड’ कंपनीचा संचालक रवींद्र रोहिदास नायक याच्याविरोधात सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच आरोपीविरोधात यापूर्वीही अशाच प्रकारच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अलीकडेच अटक करण्यात आली होती.
नवी मुंबई गुन्हे शाखेच्या आर्थिक गुप्तवार्ता कक्षाला ‘फार्म एन लँड’ कंपनीमार्फत जमीन विक्रीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सानपाडा येथील सेक्टर ३० ए मधील जी स्क्वेअर बिझनेस पार्कमधील कंपनीच्या कार्यालयाची आणि संबंधित व्यवहारांची पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान काही गुंतवणूकदारांकडून लाखो रुपये स्वीकारूनही जमीन त्यांच्या नावावर करण्यात आलेली नसल्याचे उघड झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र नायक याने सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पनवेल परिसरात कमी दरात प्लॉट उपलब्ध असल्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. प्रति गुंठा अडीच लाख ते साडेतीन लाख रुपयांत जमीन मिळणार असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आले. त्यानंतर संबंधितांना साई-पनवेल परिसरातील जागांची पाहणी करून देण्यात आली. काही प्रकरणांत शेतकऱ्यांसोबत व्यवहार सुरू असल्याचे भासवून विश्वास संपादन करण्यात आला.
गुंतवणूकदारांकडून पूर्ण रक्कम स्वीकारल्यानंतर जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया मात्र पुढे नेण्यात आली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधितांना जमीन ताब्यात मिळाली नाही किंवा व्यवहार पूर्ण करण्यात आला नाही. या प्रकारात सहा गुंतवणूकदारांची एकूण ३० लाख ९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपी रवींद्र नायक याच्याविरोधात यापूर्वी सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यातही अशाच प्रकारच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात त्याला १४ मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना जमीन किंवा प्लॉट खरेदीपूर्वी संबंधित कागदपत्रांची शहानिशा करण्याचे तसेच आकर्षक दरांच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
