पनवेल : दहा वर्षांच्या बालिकेला लैंगिक अत्याचाराच्या उद्देशाने सार्वजनिक शौचालयात नेऊन डांबल्याचा आरोप पनवेल महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यावर करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी वाल्मीकनगर येथे घडलेल्या या प्रकाराची माहिती परिसरातील काही मुले आणि तरुणांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने शौचालयाकडे धाव घेतली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास शहरातील वाल्मीकनगर येथील सार्वजनिक शौचालयात ही घटना घडली. हसमुख वाघेला (२४) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, तो ठाणा नाका परिसरात राहतो. तो पनवेल महापालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत आहे.

पीडित बालिकेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दहा वर्षांची बालिका घराशेजारील सार्वजनिक शौचालयासमोर खेळत होती. त्या वेळी स्वच्छता कर्मचारी वाघेला याने तिला विक्षिप्त हावभाव करून जवळ बोलावले. त्यानंतर गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने तिला सार्वजनिक शौचालयात नेऊन डांबल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

परिसरातील काही जागरूक मुले आणि तरुणांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तातडीने शौचालयाजवळ धाव घेतली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वाघेला याच्याकडून पहिल्यांदा बालिकेला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर हसमुख याला पकडून पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

वाघेला हा सुमारे दीड वर्षापूर्वी त्याच्या वडिलांच्या जागेवर पनवेल महापालिकेच्या स्वच्छता विभागात कामावर लागल्याची माहिती आहे. मंगळवारी स्वच्छता विभागाच्या पर्यवेक्षकाने त्याला मंगळवारी वाल्मीकनगर परिसरात स्वच्छतेचे काम नेमून दिले होते. याच दरम्यान हा प्रकार घडल्याचे समजते.

पीडित बालिकेच्या पालकांच्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात वाघेला याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ७४ सह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो), २०१२ मधील कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील वाघ यांनी वाघेला याला अटक केली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.