पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी अखेर पनवेल शहर पोलिसांनी सुमारे २०० ते ३०० आंदोलकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. वाहतूक कोंडी करून जनजीवन विस्कळीत करणे, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, शासकीय कामात अडथळा आणणे तसेच पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप या गुन्ह्यात करण्यात आला आहे. आंदोलन करू दिले नाही, उलट गुन्हे नोंदविल्याने प्रकल्पग्रस्तांनी पोलिसांच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त केला आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री पावणेनऊ वाजता हवालदारांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७(१)(३) आणि १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दफ्तरी झालेल्या नोंदीप्रमाणे बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुमारे २०० ते ३०० महिला व पुरुष आंदोलनासाठी एकत्र आले होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी विनापरवानगी आंदोलन करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी जमाव बेकायदेशीर असल्याचे सांगून आंदोलकांना तेथून निघून जाण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आणि जनजीवन विस्कळीत झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच कारवाईची सूचना दिल्यानंतर काही आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोपही गुन्ह्यात नमूद करण्यात आला आहे.

आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर प्रकल्पग्रस्तांचा एक गट आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलनात सहभागी झालेल्या काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वेच्छेने पोलीस वाहनात बसणे पसंत केले. मात्र काही आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर पोलिसांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला.