पनवेल : रस्त्यांच्या काँक्रीटीकरण आणि डांबरीकरणासाठी कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असतानाही पनवेल परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत असून, दुचाकीस्वारांसाठी हा प्रवास अधिक धोकादायक ठरत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांच्या खोलीचा अंदाज येत नसून, वाहने आदळण्याच्या घटनांमुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीतील मुख्य काँक्रीट रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या या रस्त्यावरील काँक्रीट तुटून काही ठिकाणी लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. तळोजा वाहतूक पोलीस चौकीसमोरील काँक्रीटमधून बाहेर आलेल्या सळ्या गॅस कटरने कापण्यात आल्या; मात्र तेथील खड्डा तसाच राहिला आहे. औद्योगिक क्षेत्रात अवजड वाहनांची सतत वाहतूक असल्याने अशा खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
पनवेल शहरातील स्वामी नित्यानंद मार्गावर सहस्रबुद्धे रुग्णालयाजवळील खड्ड्यामुळे वाहने जोरात आदळत आहेत. हा परिसर महापौर नितीन पाटील यांच्या प्रभागात येतो. शहरातील अनेक रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाल्याने तुलनेने खड्डे कमी असले, तरी उर्वरित रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याची गरज आहे.
खांदेश्वर वसाहतीकडून खांदेश्वर रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. रेल्वे प्रवासासाठी घाईत असलेल्या प्रवाशांना रिक्षा आणि अन्य वाहनांतून खड्ड्यांचे धक्के सहन करत स्थानक गाठावे लागते.
नवीन पनवेल सेक्टर सातमधील उड्डाणपूल उतरल्यानंतर तसेच सेक्टर आठमधील उद्यानाशेजारीही रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. सेक्टर आठ आणि नऊच्या मधील रस्त्यावर श्री समर्थ व्यायामशाळेजवळ पाऊस थांबल्यानंतरही पाणी साचून राहत आहे. खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांसह स्थानिक रहिवाशांची गैरसोय होत असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने रस्ते दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कळंबोली चौकात गंभीर समस्या
कळंबोली चौक परिसरात खड्ड्यांची समस्या गंभीर झाली आहे. पनवेलकडून मुंबईतील शीवच्या दिशेने जाताना कळंबोली चौकात वाहनचालकांना मोठ्या खड्ड्यांतून मार्ग काढावा लागतो. या ठिकाणी वाहनांचा वेग अचानक कमी करावा लागत असल्याने वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. अवजड वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या या परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. खड्डे बुजविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तात्पुरती डागडुजीही करण्यात येते मात्र ती पुरेशी नसल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
खड्डे बुजवण्यासाठी चार वेगवेगळ्या प्रभागांमध्ये प्रत्येकी एक ठेकेदाराची नियुक्ती करून त्या कामाच्या देखरेखीसाठी एक अभियंत्यांची नेमणूक केली आहे. महानगर गॅसच्या कामासाठी केलेल्या खोदकाम केल्यानंतर केलेल्या दुरूस्तीमध्ये काही ठिकाणी खड्डे पडले असतील ते दुरुस्त करण्याचे काम केले जात आहे. खड्डे भरल्यानंतर त्यावर रोलरने दाबही देतो. मात्र वाहनांची वर्दळ अधिक असल्याने खड्डे पडत असून ते भरण्याचे काम सुरू आहे.- राजेश कर्डिले, शहर अभियंता, पनवेल महापालिका
