पनवेल – पनवेल रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळपासून तिकीट काऊंटर आणि फलाट परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी उसळत असून, विशेष गाडीत जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत आहे. या वाढत्या गर्दीचे नियोजन करण्याची मागणी नियमित प्रवाशांकडून होत आहे.पनवेल स्थानकातून दर आठवड्याला सोमवारी सकाळी ११.५० वाजता सुटणारी गाडी क्रमांक ११०३१ पनवेल–अलीपुरद्वार अमृतभारत एक्सप्रेस (पश्चिम बंगाल, आसाम) ही परप्रांतीय मजुरांसाठी महत्त्वाची ठरत आहे.
२३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या गाडीत ११ जनरल आणि ८ स्लीपर डबे असून, या गाडीसाठी पहाटेपासूनच तिकीट काऊंटरवर लांबच लांब रांगा लागतात. सध्या स्थानकाच्या विकासकामांमुळे तिकीट काऊंटरमार्गेच प्रवेशासाठी एकच मार्ग उपलब्ध असल्याने प्रवाशांची अधिकच गैरसोय होत आहे. मोठ्या प्रमाणावर परराज्यात जाणारे मजूर तिकीटासाठी रांगेत उभे राहत असल्याने इतर एक्सेप्रेस आणि लोकलच्या प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वे प्रशासनाने सहा तिकीट काऊंटर आणि सुमारे १५ स्वयंचलित मशीन उपलब्ध करून दिली असली तरी गर्दी नियंत्रणात येत नाही. पनवेल स्थानक भविष्यात टर्मिनल म्हणून विकसित होणार असल्याने, दररोज गाड्या सुटू लागल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. पनवेल हे भविष्यात महत्वाचे रेल्वे टर्मिनल होत आहे. सध्या रेल्वे स्थानकाच्या विस्ताराचे काम जोरदार सुरू आहे.
मात्र टर्मिनलचे नियोजन केल्यानंतरही तिकीट काऊंटरवर एका गाडीमुळे या गर्दीचा अनुभव होत असेल तर प्रत्येक दिवसाला अशा दोन ते तीन गाड्या पनवेल स्थानकातून सुटल्यास या गर्दीचा ताण स्थानकावर पडेल. रेल्वे नियोजन विभागाने याचे भान ठेऊनच पुढील नियोजन करावे अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे.
