पनवेल – पनवेल रेल्वे स्थानकातील वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोमवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक ७ वरील उदवाहक (लिफ्ट) अचानक बिघडल्याने चार प्रवासी काही काळ त्यात अडकून पडले.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आणि काही वेळाच्या प्रयत्नांनंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.पनवेल रेल्वे स्थानक हे मुंबई महानगर क्षेत्रातील महत्त्वाचे आणि वेगाने विकसित होणारे स्थानक असून, येथे सध्या स्थानकातील फलाटांची संख्या वाढवली जात असल्याने पनवेल स्थानकाचा विस्तार टर्मिनलच्या दिशेने मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे स्थानकातील प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. फलाट क्रमांक ७ हा विशेषतः लांब पल्ल्याच्या जलदगती गाड्यांसाठी महत्त्वाचा असल्याने येथे दिवसभर मोठी वर्दळ असते.

काही वर्षांपूर्वीच प्रवाशांच्या सोयीसाठी येथे आधुनिक उदवाहक आणि सरकते जिने बसविण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि महिलांसाठी या सुविधांचा मोठा आधार ठरत असला, तरी अशा प्रकारचे बिघाड घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या उदवाहकाची नियमित देखभाल व दुरुस्ती वेळेवर करण्यात आली होती का, की तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली, याबाबत रेल्वे प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी लिफ्टमध्ये प्रवासी गेल्यानंतर लिफ्टचा दरवाजा व्यवस्थित बंद न झाल्याने १० ते १५ मिनिटांसाठी प्रवासी लिफ्टमध्ये अडकून होते. तातडीने रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक विभागाने लिफ्टजवळ येऊन दरवाजा उघडून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सध्या या लिफ्टच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, असे निला यांनी लोकसत्ताला सांगितले. लिफ्टमध्ये प्रवासी अडकल्याचे समजताच नवीन लिफ्टची वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती न केल्याने अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

या घटनेमुळे पनवेल स्थानकातील सुविधा सुरक्षित आहेत का, हा सवाल उपस्थित झाला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.