पनवेल : आरिवली गावाजवळील आरएमसी प्लान्टमध्ये फिरत्या सिमेंट मिक्सरच्या टाकीत पडून १८ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. कामगाराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याचा आरोप असून, या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी कृष्ण कला डेव्हलपर्स आरएमसी कंपनीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तालुक्यात सुरू असलेल्या विविध बांधकाम प्रकल्पांवरील आरएमसी प्लान्टमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील काकरकुंड गावचा मूळ रहिवासी असलेला मनीषकुमार यादव याचा या अपघातात मृत्यू झाला. रविवारी (ता. १६) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास मनीष आरिवली गावाजवळील आरएमसी प्लान्टमध्ये काम करीत होता. यावेळी तो फिरत्या सिमेंट मिक्सरच्या टाकीत पडला. या दुर्घटनेत त्याच्या पाठ, छाती आणि हाताला गंभीर दुखापत झाली.
मनीषला उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी (ता. १७) मनीषच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी यांनी दिली. या प्रकरणी कृष्ण कला डेव्हलपर्स आरएमसी कंपनीविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पनवेल तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून विविध ठिकाणी आरएमसी प्लान्ट उभारण्यात आले आहेत. या प्लान्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत का, हा प्रश्न आरिवली येथील घटनेनंतर उपस्थित झाला आहे. कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्लान्टमध्ये नियमांचे पालन होते का, याची तपासणी करण्याची गरज आहे. तालुक्यात शासनाच्या परवानगीने सुरू असलेल्या आरएमसी प्लान्टची संख्या किती आहे, तसेच त्यापैकी किती प्लान्टमध्ये कामगारांच्या सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जाते, याची पोलीस आणि कामगार विभागाने पडताळणी करण्याची मागणी होत आहे.
