पनवेल : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हलक्या मोटारींना टोलनाक्यावर सवलत मिळावी यासाठी पनवेल परिवहन विभागाने हलक्या मोटारमालकांसाठी झटपट ऑनलाइन पास काढण्याची सुविधा सुरू केली आहे. वाहनमालकांना आरटीओ कार्यालयात वारंवार येण्याची गरज भासू नये आणि टोलनाक्यावर पासासाठी अधिक वेळ थांबावे लागू नये, यासाठी rtopanvel.tectignis.in या संकेतस्थळावरून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत १०० हून अधिक वाहनमालकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. सुट्टीच्या दिवसांमध्येही खारघर येथील व्हॅलीशिल्प सोसायटीतील पनवेल आरटीओचे कार्यालयात मोफत पास मिळण्यासाठीची सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे.  पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना या सुविधेमुळे पास मिळविण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. वाहनमालकांनी संकेतस्थळावर वाहन क्रमांक, वाहनमालकाचे नाव, प्रवासाचा टप्पा, प्रवासाची तारीख आणि वेळ यांसह वाहनाचे आरसी, विमा आणि पीयूसीची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावीत.

पनवेल आरटीओ कार्यालयात या सुविधेची माहिती देणारी मराठी आणि इंग्रजी भाषेतील भित्तिपत्रके लावण्यात आली आहेत. त्यावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर वाहनमालकांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. अर्जाची नोंदणी केल्यानंतर त्या अर्जाची प्रत तसेच ऑनलाइन जोडलेल्या वैध कागदपत्रांची दुय्यम प्रत घेऊन खारघर येथील पनवेल आरटीओ कार्यालयातील अनुज्ञप्ती विभागात जमा करावी लागणार आहे.

ऑनलाइन अपलोड केलेल्या कागदपत्रांवरील तारखा किंवा अन्य महत्त्वाच्या नोंदी स्पष्ट दिसत नसल्यामुळे प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात जाऊन या कागदपत्रांची दुय्यम प्रत द्यावी लागणार आहे. त्यामुळे वाहनमालकांनी मूळ कागदपत्रांसह त्यांची दुय्यम प्रत घेऊन येण्याचे आवाहन आरटीओ मार्फत करण्यात आले आहे. मूळ कागदपत्रांची पडताळणी लगेच झाल्यानंतर संबंधित वाहनमालकाला पास देण्याची व्यवस्था खारघर येथील आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे.

गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवारी व रविवारीही पास देण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणाकडे जाण्यापूर्वी वाहनमालकांनी ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी जाणा-या वाहनमालकांना वाहनाची वैध पीयुसी प्रमाणपत्र, विमा (इन्स्युरन्स), आर.सी. बूक हे अपडेट ठेऊन सूरक्षित प्रवास करता येईल. 

 “गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनमालकांची गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन टोलपासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहनमालकांनी त्याचा लाभ घ्यावा. वाहनमालकांनी प्रवासापूर्वी ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि त्यानंतर मूळ कागदपत्रांसह आरटीओ कार्यालयात पडताळणी करून घ्यावी. त्यामुळे टोलनाक्यावर होणारा विलंब टाळता येईल आणि गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुलभ होईल.” – जयंत चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल