पनवेल : ग्रामीण पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अनेक गट व गणांमध्ये दुरंगी, तिरंगी ते चौरंगी लढती होत असल्याने राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत. भाजपचे कमळ विरुद्ध शेकापचा खटारा अशी थेट टक्कर बहुसंख्य ठिकाणी आहे. शहरी मतदारसंख्येच्या वाढीसह ग्रामीण प्रश्नांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

जिल्हा परिषदेच्या वावंजे, नेरे, पाली देवद, पळस्पे, वडघर आणि केळवणे या सहा गटांमध्ये भाजपविरुद्ध शेकाप अशी दुरंगी लढत होणार आहे. वावेघर गटात भाजप विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात थेट सामना रंगणार आहे. गव्हाण गटात महाविकास आघाडीतील बिघाडी स्पष्ट असून मनसेने उमेदवार दिल्याने येथे भाजप, शेकाप, मनसे व अपक्ष असे चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेकापने जिल्हा परिषदेच्या ८ पैकी ६ जागांवर उमेदवार दिले असून भाजपने महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागेची संधी जिल्हा परिषदेच्या गटामध्ये दिलेली दिसत नाही. मात्र पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) आपटा, वहाळ, करंजाडे, पळस्पे या चार गणांमध्ये उमेदवार उभे करून मैत्रीपूर्ण लढतीचे निशाण फडकवले आहे.

पळस्पे पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीने शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवाराला संधी दिल्याने तेथे महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. तसेच करंजाडेमध्ये महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिल्याने येथे शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार नशीब अजमावत आहेत. वहाळ गणामध्ये महायुतीचे तीनही पक्ष आमनेसामने असल्याने वहाळमध्ये महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.

अशी होणार लढत

पंचायत समितीच्या १६ गणांपैकी नेरे, आदई, विचुंबे, कोन, वावेघर, वडघर व केळवणे या ७ गणांमध्ये दुरंगी लढत आहे. आपटा, गव्हाण, करंजाडे, पोयंजे, पळस्पे व चिंध्रण या ६ गणांमध्ये तिरंगी लढत होत असून पाली देवद येथे एका गणासाठी चौरंगी सामना होणार आहे. वावंजे व वहाळ या दोन गणांमध्ये प्रत्येकी पाच उमेदवार एका जागेसाठी स्पर्धेत आहेत.

ग्रामीण मतदारसंख्या निर्णायक ठरणार

अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी १८ आणि पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ४६ असे एकूण ६४ उमेदवार आमनेसामने आहेत. रायगड जिल्हा परिषदेत पनवेल तालुक्यातील जागांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्यावर वर्चस्वासाठी दोन्ही बाजूंनी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. उलवा, करंजाडे व सुकापूर येथील नव्या वसाहतींमधील शहरी मतदारांसह ग्रामीण मतदारसंख्या निर्णायक ठरणार आहे.