पनवेल : लाखो रुपये किमतीची घरे खरेदी केली मात्र पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसल्याने वर्षभरात करंजाडेवासियांना दीड कोटी रुपयांचे टँकरचे पाणी खरेदी करुन प्यावे लागले. अशी संतापजनक परिस्थिती करंजाडेची असल्याने करंजाडेवासियांना दुसऱ्यांदा मोर्चाचे हत्यार उपसावे लागले. मंगळवार आणि पाऊस असल्याने कामावर सुट्टी टाकून अनेक नागरिक या मोर्चात छत्री व पाण्याची बाटली घेऊन सहभागी झाले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरीक व महिलांचा समावेश होता.

करंजाडे वसाहतीच्या पाणी प्रश्नासाठी उरणच्या आमदारांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. मागील अनेक वर्षे रहिवाशी समाजमाध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांवर पाणी प्रश्नावर बोंबाबोंब करुनही उरणचे अपक्ष आ. महेश बालदी हे पाणी प्रश्न सोडवू न शकल्याने करंजाडेतील रहिवाशांनी संताप जाहीर केला होता. अखेर चार महिन्यांवर विधानसभेच्या निवडणूका असल्याने आ. बालदी यांनी सिडको भवनात करंजाडे वसाहतीच्या पाणी प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मागील आठवड्यात सिडको अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

हेही वाचा…खारघरच्या फेरीवाल्यांकडून हप्ते वसूली

मदारांच्या बैठकीपूर्वीच नागरिकांच्या संघटनेने मंगळवारचा दिवस मोर्चासाठी जाहीर केल्यामुळे मंगळवारी ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजता मोर्चा वसाहतीमधील सेक्टर ६ येथील बस थांब्यापासून सुरू झाला. या मोर्चेकरींना जेएनपीटी महामार्ग रोखायचा होता. मात्र पोलिसांनी विरोध केल्यामुळे आणि सिडको अधिकाऱ्यांनी वसाहतीमध्येच आंदोलन ठिकाणी येऊन आश्वासन देण्याचे ठरल्याने मोर्चेकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या चौकी शेजारीच मोर्चा थांबवला. सिडको मंडळाचे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रणिक मुळ यांनी मोर्चेकऱ्यांना जीर्ण जलवाहिनी यापुढे बंद ठेऊन नवीन जलवाहिनीतून पाणी पुरवठा कार्यान्वित केल्याची माहिती दिली.

हेही वाचा…पनवेल: तरणतलावाच्या प्रशिक्षकाकडून महिलेचा विनयभंग 

तसेच २० दश लक्ष लिटर पाण्याची गरज असलेल्या वसाहतीला यापुढे सूरळीत पाणी पुरवठा होईल असे आश्वासन दिले. करंजाडे पिपल्स फाऊंडेशनचे विनोद साबळे, रामेश्वर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोशिएशन या सोसायट्यांच्या संघटनेने पाठिंबा दिल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर यांनी सांगितले.