पनवेल – पनवेल महानगरपालिकेच्या काळुंद्रे गावातील ‘श्री महालक्ष्मी महिला बचतगट’ या बचतगटाला दिल्ली येथे झालेल्या अमृत महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून मनोगत मांडण्याची संधी मिळाली. महिलांच्या कार्यक्षमतेची दखल घेत केंद्र शासनाने दिलेल्या या संधीमुळे पनवेल महापालिकेच्या बचतगटाचा सन्मान वाढला आहे. अमृत व डे-एन.यु.एल.एम. कृतीसंगम कार्यक्रमांतर्गत स्थापन बचतगटातील सदस्यांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने ‘अमृत मित्र’ हा उपक्रम राबविला आहे. याच उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर १३ मार्चला नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे ‘अमृत महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता.
देशभरातील ३० राज्यांमधील महिला बचतगटांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील निवड झालेल्या १४ महानगरपालिका व नगरपालिकांमधून पनवेल महानगरपालिकेची निवड होऊन ‘श्री महालक्ष्मी महिला बचतगट’ यांना राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.या कार्यक्रमात बचतगटातील महिलांनी अमृत योजनेअंतर्गत केलेल्या कामांचा अनुभव मांडला. ‘अमृत मित्र’ उपक्रमांतर्गत पाणी पुरवठा, मलनिस्सारण, हरित क्षेत्र विकास व वृक्षारोपण यांसारख्या कामांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यात आला आहे.
पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी कैलास गावडे व उपअभियंता विलास चव्हाण यांच्या सूचनेनुसार महिलांना विविध कामे देण्यात आली. श्री महालक्ष्मी महिला बचतगटाची स्थापना २०१९ मध्ये झाली असून या गटात १२ महिला कार्यरत आहेत. अमृत योजनेअंतर्गत त्यांनी पाणी शुद्धता तपासणीचे काम हाती घेतले. महापालिकेकडून प्रशिक्षण व आवश्यक साधने मिळाल्यानंतर या महिलांनी भिंगारी व काळुंद्रे परिसरातील पाणी तपासणी नियमितपणे करून अहवाल सादर केला.
या कामात महिलांच्या बचतगटाला ७ लाखांचे उत्पन्न मिळवता आले. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना राज्यातून अनुभव मांडण्याची संधी मिळाली.डेएनयुएलएम विभागाचे उपायुक्त अभिषेक पराडकर, सहाय्यक आयुक्त डॉ. रुपाली माने तसेच शहर अभियान व्यवस्थापक विनया म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सहभाग शक्य झाला. पनवेल महापालिकेअंतर्गत सुमारे ४६० बचतगटांच्या माध्यमातून ४ हजार महिलांना आर्थिक सक्षमीकरणाची संधी उपलब्ध झाली आहे.
