सरकारी दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी २०११ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पाच वर्षांपासून पूर्ण होऊ शकलेले नाही. १३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या रुग्णालय इमारतीचे बांधकाम येत्या सप्टेंबरमध्ये पूर्ण होणे गरजेचे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोरे यांनी २०१७ मध्ये तडीस जाईल, असा अहवाल आरोग्य विभागाला पाठविला आहे. त्यामुळे रुग्णालय उभारणीच्या कामात तांत्रिक अडचणी वाढल्या आहेत. यासाठी शिवसेनेने जोर लावला आहे. प्रस्तावित रुग्णालय सुरूझाल्यास यात आयुर्वेदिक आणि होमिओपेथी विभाग सुरू करण्यासाठी शहर शिवसेनेच्या नेत्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

पनवेल ग्रामीण रुग्णालयातच शवविच्छेदनाची सोय आहे. याशिवाय मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलमध्ये ट्रॉमा सेंटर उभारलेले नाही. त्यातच सरकारी रुग्णालय इमारतीच्या बांधकामाची रखडपट्टी सुरू आहे. त्यामुळे पनवेलची वैद्यकीय व्यवस्था पूर्णपणे खासगी रुग्णालयांच्या हाती गेली आहे. इमारतीचा कंत्राटदाराने बिल थकल्याने काम मंदगतीने सुरू ठेवल्याचे बोलले जात आहे; मात्र याविषयी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता रुग्णालयाचे काम मार्च २०१७ मध्येच पूर्ण होणार असल्याचे सांगितले.

भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आरोग्य विभागाच्या उपसंचालिका रत्ना रावखंडे यांनी एक संयुक्त बैठक घेऊन सप्टेंबपर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली होती; मात्र हे बांधकाम मार्च २०१७ मध्ये पूर्ण होईल, असा अहवाल आरोग्य विभागाला सोपविला आहे.

सुविधा अशा आहेत

  • १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि २० खाटांचे ट्रॉमा सेंटर
  • प्रत्येक आजारावरील एक विशेष तज्ज्ञ
  • शवागार, सिटी स्कॅन, एक्सरे, सोनोग्रोफी, रक्त साठवणूक केंद्र, शस्त्रक्रिया आगार, अतिदक्षता विभाग,
  • लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग, प्रसूती आणि लहान मुलांसाठी सोय