पनवेल – पनवेलमध्ये नावडे येथील हुंडाबळीमुळे विवाहितेच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच, दोन दिवसांपूर्वीच पनवेल शहरात आणखी एका महिलेच्या आत्महत्येची नोंद पोलीस ठाण्यात झाल्याने शहर हादरून गेलं आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल ५.३० कोटी रूपयांची फसवणूक झाल्यामुळे आणि त्यातून झालेल्या मानसिक छळामुळे ३६ वर्षीय विवाहित महिलेनं आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे ऑनलाईन गुंतवणुकीतील फसवणुकीमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक व मानसिक ताणाचा आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नाचा पुन्हा एकदा पुनरुच्चार झाला आहे.पनवेल शहरातील बालाजी आंगण या इमारतीच्या ११ व्या मजल्यावर राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने ८ ऑक्टोबर रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या दिवशी त्यांचा पती बाहेरगावी होता.
सकाळी मुलांना शाळेत पाठवल्यानंतर त्यांनी पतीला ‘मुलांसाठी जेवण तयार केले’ असा फोटो पतीला पाठवला होता. मात्र त्यानंतर फोन न उचलल्याने नातेवाईकांना संशय आला. दुपारी तीनच्या सुमारास शाळेतून परतलेल्या मुलांना आईने आत्महत्या केल्याचं आढळलं.सर्वांसोबत हसत खेळत असणा-या पिडीतेने आत्महत्येचा मार्ग का निवडला या प्रश्नाने तीच्या कुटूंबाला हादरून सोडले होते. सुरुवातीला ही घटना मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा समज होता. मात्र कोणामुळे हा मानसिक ताण होता हे अस्पष्ट होते. परंतु नंतर मृत महिलेने काही दिवसांपूर्वी नातेवाईकांकडून उसने पैसे मागितल्याची माहिती लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर पिडीतेच्या बँक खात्याची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर संशयास्पद व्यवहार आढळले. अखेर मृत महिलेचे ६५ वर्षीय वडिलांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.या तक्रारीनुसार, गुजरातमधील सुरेंद्रनगर येथील रवी हरेशभाई भडका या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र आत्महत्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडका याने २०२३ पासून फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत फिर्यादीच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला काही रकमेचा परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तब्बल ५.३० कोटींची रक्कम गुंतवणुकीच्या नावाखाली घेतली. मात्र, गेल्या वर्षभरात कोणताही परतावा न देता उलट पिडीतेवर पैशांसाठी दबाव आणत मानसिक त्रास दिला. या सततच्या छळाला कंटाळूनच ३६ वर्षीय पिडितेने आत्महत्या केली, असे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहाय्यक निरीक्षक प्रविण फडतरे हे करीत आहेत. पनवेल शहरात आठवड्याभरात दोन महिला आणि एका तरूण विद्यार्थीनीच्या आत्महत्यांनी खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षेसोबतच आर्थिक फसवणूक आणि मानसिक आरोग्याच्या आधारव्यवस्थेबाबत अधिक ठोस उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
