पनवेल – महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील जन्म झाल्याची नोंदणी करून सरकारी ओळखप्राप्त करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेल तालुक्यात वलप या गावात ३८ दिवसात तब्बल २६६० बनावट जन्मनोंदणी प्रमाणपत्रे नोंदविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या ग्रामपंचायतीच्या अधिकृत ग्रामसेविकेच्या जन्म मृत्यू नोंदणीच्या पोर्टलचा गैरवापर करून हा प्रकार झाल्याचे स्पष्ट होताच जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत जिल्ह्यात मागील काही महिन्यात झालेल्या अशापद्धतीच्या ३९,१२५ संशयीत नोंदणीच्या पडताळणीचे आदेश दिले आहेत.

याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुरूवारी रितसर संबंधित ग्रामसेविकेने गुन्हा दाखल केला आहे.मागील वर्षी ३० सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर या अवघ्या ३८ दिवसांच्या कालावधीत वलप ग्रामपंचायतीच्या जन्म व मृत्यू नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या नागरी नोंदणी प्रणाली (सीआरएस) पोर्टलवरील निबंधकाचा युजर आयडी व पासवर्ड गैरमार्गाने वापरून २६६० जन्म प्रमाणपत्रांची नोंद केल्याचे तपासात समोर आले. या नोंदींचा वापर मतदान ओळखपत्रे व इतर शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठी झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.जिल्हा प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांना पोर्टलवरील संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर त्यांनी वलप ग्रामपंचायतीकडे चौकशी केली.

मात्र ग्रामसेविकेने अशा कोणत्याही नोंदी केल्या नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर संबंधित आयडीवरून झालेल्या सर्व नोंदींची सखोल तपासणी सुरू करण्यात आली. नियमांनुसार नवजात बाळांच्या नोंदीसाठी संपूर्ण कागदपत्रे आवश्यक असताना, एका दिवसात ७० हून अधिक नोंदी झाल्याचे उघड झाले. यामध्ये १९४० आणि १९६० साली जन्म झाल्याच्या नोंदीही आढळून आल्या, ज्यामुळे पोर्टलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
वलप हे सुमारे पाच हजार लोकवस्तीचे गाव असून येथे वर्षाला केवळ १० ते १२ जन्मनोंदी होतात.

मात्र पाच हजार लोकवस्तीच्या गावात ३८ दिवसात २६६० जन्म दाखले दिल्याने या प्रकाराविषयी संशय व्यक्त झाला. गावात स्वतंत्र प्रसूतीगृह नसल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या नोंदी अविश्वसनीय असल्याचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सांगितले. ग्रामविकास अधिकारी रेश्मा गावंड यांनी याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या तपासणीत ‘अॅड ओल्ड इव्हेंट’ या पर्यायाचा वापर करून रायगड जिल्ह्यात एकूण ३९,१२५ संशयास्पद जन्मनोंदी झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पडताळणी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांना जिल्हा आरोग्य अधिका-यांनी ४ फेब्रुवारीला दिलेल्या लेखी पत्रात जन्म नोंदणी पोर्टलवरील अॅड ओल्ड इव्हेन्ट या पर्यायावरून झालेल्या जन्मनोंदणीची पडताळणी करून या नोंदी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आहेत का याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल देण्याची सूचना केली. 
पनवेल महापालिकेतील चारही प्रभाग कार्यालयामध्ये – ८,१८४ खोपोली नगरपालिका – ७४६१ श्रीवर्धन नगरपालिका – ४९११ महाड नगरपालिका – ३५८२ तळा नगरपंचायत –  ३२८१ कर्जत नगरपालिका –  २०६४ माणगाव नगरपंचायत – १८२१ म्हसळा नगरपंचायत – १६६४ मुरूड जंजिरा नगरपालिका – १२५४ पेण नगरपालिका – ११३५  अलिबाग नगरपालिका –  ११०२