पनवेल – मतदार यादीच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेत रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये ७६.९३ टक्के प्रगणक प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असताना पनवेल विधानसभा मतदारसंघात हे प्रमाण केवळ ५८.५३ टक्के आहे. त्यामुळे राज्यात व जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या पनवेलमध्ये फेरतपासणीची गती इतर मतदारसंघांच्या तुलनेत कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. रायगड जिल्ह्यातील २५ लाख ३७ हजार ३९ मतदारांपैकी १९ लाख ४९ हजार २१४ मतदारांच्या प्रगणक प्रपत्रांचे डिजिटायझेशन झाल्याचे एसआयआर अहवाल स्पष्ट झाले आहे. पनवेलमधील ६ लाख ८४ हजार ९५ मतदारांपैकी ४ लाख ३९९ हजार ७६ प्रपत्रांचे डिजिटायझेशन झाले आहे.

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत एकूण २७९० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) कार्यरत असून, सर्व बीएलओंचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील २५ लाख ३७ हजार ३९ मतदारांसाठी १९ लाख ४९ हजार २१४ प्रगणक प्रपत्रांचे डिजिटायझेशन झाले आहे. त्यापैकी १९ लाख ४८ हजार ७५२ प्रपत्रांची बीएलओंकडून पडताळणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात ५ लाख ८४ हजार ५२५ प्रपत्रे स्वीकारता न आल्याचे, तर १ लाख ८७ हजार ६४४ प्रकरणांमध्ये विसंगती आढळल्याचे तक्त्यात नमूद आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात एकूण ६ लाख ८४ हजार ९५ मतदार असून, त्यांच्यासाठी ५७४ बीएलओ कार्यरत होते. मतदारांची सर्व प्रगणक प्रपत्रे वितरित करण्यात आली आहेत.

मात्र त्यापैकी ४ लाख ३९९ हजार ७६ प्रपत्रांचेच डिजिटायझेशन झाले असून, हे प्रमाण ५८.५३ टक्के आहे. बीएलओकडून पडताळणी झालेल्या प्रपत्रांचे प्रमाण ५८.४७ टक्के आहे. पनवेलमध्ये २ लाख ८३ हजार ७०० प्रपत्रे म्हणजेच ४१.४७ टक्के प्रपत्रे स्वीकारता न आल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ६१ हजार १६८ मतदारांच्या प्रकरणांमध्ये विसंगती आढळली असून, ५ हजार ५८१ मतदारांच्या प्रकरणांमध्ये अनुपस्थित, स्थलांतरित किंवा मृत मतदार  (एएसडी) विसंगती नोंदविण्यात आली आहे. याशिवाय २५ हजार ४५३ समान वैयक्तिक तपशील असलेले मतदार (डीएसई) आणि ६२ हजार २९४ छायाचित्रात साम्य आढळणाऱ्या मतदारांच्या नोंदी  (पीएसई) प्रकरणांची नोंद आहे.

जिल्ह्यात पनवेलनंतर उरणमध्ये ७६.३५ टक्के, कर्जतमध्ये ८०.६२ टक्के, महाडमध्ये ८४.६१ टक्के, अलिबागमध्ये ८६.१८ टक्के, पेणमध्ये ८७.८४ टक्के आणि श्रीवर्धनमध्ये सर्वाधिक ८८.९२ टक्के प्रपत्रांचे डिजिटायझेशन झाले आहे. त्यामुळे पनवेलचा टक्का जिल्ह्यात सर्वांत कमी आहे. पनवेलमधील मोठ्या मतदारसंख्येच्या तुलनेत फेरतपासणीची ही पिछाडी महत्त्वाची ठरली असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दररोज ऑनलाईन बैठकांचे सत्र सुरू ठेऊनही पनवेल पिछाडीवर राहीले. उर्वरित प्रपत्रांची पडताळणी, विसंगतींचे निराकरण आणि स्वीकारता न आलेल्या प्रकरणांवरील निर्णयानंतर मतदार यादीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. प्रारूप यादीमध्ये ज्या मतदारांचे नाव नसेल त्यांनी मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठीचा ६ क्रमांकाचा अर्ज भरून नव्याने ते मतदार यादीत त्यांचे नाव येऊ शकेल. पोर्टलवर आणि बीएलओ मार्फत ही प्रक्रिया २४ ऑगस्टनंतर सुरू होईल. प्रारूप यादी लवकरच निवडणूक विभागाच्या पोर्टलवर विविध सरकारी कार्यालयांमध्ये आणि विविध राजकीय पक्षांना दिल्या जातील. – पवन चांडक, उपविभागिय अधिकारी, पनवेल