नवी मुंबई : झपाट्याने होत असलेले नागरीकरण, वाढणारी लोकसंख्या आणि तुलनेने विस्कळीत पाणी वितरण व्यवस्थेमुळे खारघरपासून पनवेलपर्यतच्या उपनगरांमध्ये पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत असतानाच या उपनगरांना ‘मोरबे’तून वाढीव पाणी मिळावे यासाठी आता सिडको आणि पनवेल महापालिकेने आग्रह धरला आहे. जुलै महिन्यापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ‘मोरबे’ धरणाची पाणी पातळी वाढली असल्याने वाढीव पाणी मिळावे अशास्वरुपाचा हा प्रस्ताव आहे. मात्र ‘मोरबे’ धरण अद्याप भरलेले नाही, त्यामुळे आमच्या शहरात पाणी कपात सुरु असल्याने नवी मुंबई महापालिकेने ही मागणी फेटाळली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे, खारघर व तळोजा या उपनगरांना नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मोरबे धरणाची संपूर्ण मालकी नवी मुंबई महापालिकेकडे असताना या धरणातील पाणी सिडको उपनगरांना दिले जात असल्यामुळे येथील राजकीय वर्तुळात यापुर्वीच नाराजीचा सुर व्यक्त करण्यात आला होता. वन मंत्री गणेश नाईक यांनी मोरबेतून पनवेल परिसरास वाढीव पाणी देण्यास जाहीर विरोध केला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्राला एमआयडीसीच्या बारवी धरणातून दररोज ८० एमएलडी इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. मात्र पुर्ण क्षमतेने हे पाणी नवी मुंबईला मिळत नाही.

त्यामुळे ऐरोली, दिघा तसेच आसपासच्या परिसरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत असतो. जून महिन्यात पावसाने ओढ घेतल्यामुळे सद्यस्थितीत नवी मुंबई परिसरात पाणी पुरवठा कपातीचे वेळापत्रक लागू आहे. आठवड्यातून दोन दिवस सायंकाळच्या वेळेत उपनगरांना पाणी पुरवठा बंद केला जात आहे. मोरबे धरण पुर्ण क्षमतेने भरत नाही तोवर ही कपात कायम राहील अशी भूमीका यापुर्वीच महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सिडको तसेच पनवेल महापालिकेने मोरबेतून वाढीव पाणी मागितल्याने त्याविषयी फारशी सकारात्मक भूमीका नवी मुंबई महापालिका प्रशासनाने घेतलेली नाही.

पनवेल सदैव तहानलेले

राज्य सरकारने एलनिनोच्या संकटामुळे पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात पाणी समस्या भेडसावू नये म्हणून १० टक्के पाणी कपातीचे आदेश सर्वच महापालिकांना दिले. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने खारघर, तळोजा व कामोठे या उपनगरांमध्ये यापुर्वीच कपात लागू केली आहे. या कपातीमुळे पनवेल महापालिका हद्दीत पाणी टंचाईचे चित्र अजून गंभीर बनले आहे. सिडको उपनगरात तर पाण्यासाठी रहिवासांचे मोर्चे निघू लागले आहेत. पनवेल महापालिकेच्या उपनगरांमध्येही स्थिती फारशी बरी नाही.

सद्यस्थितीत खारघर आणि कामोठे येथे दर शुक्रवारी कमी पाणीपुरवठा केला जात आहे. मोरबे धरणातील पाण्यावर नवी मुंबईचा मालकी हक्क असला तरी पनवेललाही सिडकोच्या ठरलेल्या कोट्यानुसार पाणी मिळावे, अशी मागणी भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांनाही लेखी पत्र दिले आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिकांना शहाड-टेमघर पाणीपुरवठा प्राधिकरणाच्या (स्टेम) माध्यमातून संयुक्तपणे पाणीपुरवठा केला जातो.

त्याच धर्तीवर मोरबे धरणाच्या पाण्याचे वाटप करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, महाजन यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. गणेश नाईक यांनी तर त्यास कडवा विरोध केला आहे. सध्या पनवेलला दररोज सुमारे ३० ते ४० दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना टँकरचे पाणी विकत घेऊन दैनंदिन गरजा भागवाव्या लागत आहेत.

पत्रव्यवहार सिडको आणि नवी मुंबई महापालिका

सिडको मंडळाने पाणीपुरवठ्यात वाढ करण्याची मागणी करीत नवी मुंबई महापालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. ४ ऑगस्ट रोजी सिडकोने नवी मुंबई महापालिकेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मे महिन्यापर्यंत सिडको क्षेत्राला ५७ एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. राज्य सरकारने १० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतल्यानंतर सिडको क्षेत्राला ५१ एमएलडी पाणी मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४२ ते ४६ एमएलडी म्हणजेच सुमारे २६ टक्के पाणीकपात केली जात आहे.

या पत्रावर नवी मुंबई महापालिकेने पाठविलेल्या पत्रात मोरबे धरण क्षेत्रात पर्जन्यमान सुरळीत होऊन धरणातील पाणीसाठ्यात पुरेशी वाढ झाल्यानंतर महापालिका पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन करेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर सिडकोने केलेली ५७ एमएलडी पाणीपुरवठ्याची मागणी तातडीने विचाराधीन घेतली जाईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पनवेल महापालिकेकडे अद्याप सिडको मंडळाकडून पाणी पुरवठा सेवा हस्तांतरण झाली नसली तरी नागरिकांना होणा-या अपु-या पाणी पुरवठ्यामुळे नवी मुंबई महापालिका आणि सिडको मंडळाकडे आम्ही पाठपुरावा केला आहे. नवी मुंबई महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. तसेच अपुरा पाणी पुरवठा होत असलेल्या ठिकाणी भाड्याने टॅंकर घेऊन पाणी पुरवठा पनवेल महापालिका करत आहे. लवकरच १० टॅंकर स्वमालकीचे खरेदी करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मांडणार आहे. – मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका

सिडको मंडळाच्या प्रत्येक पत्राला नवी मुंबई महापालिकेने उत्तर दिले आहे. मोरबे धरण हे अद्याप पुर्णपणे भरले नाही. नवी मुंबईतच सध्या पाणी कपात लागू आहे. जोपर्यंत धरण पुर्णपणे भरत नाही आणि आमच्या शहराची गरजा भागत नाही तोपर्यंत आम्ही दूस-यांना पाणी देऊ शकत नाही. – मदन वाकचौडे, अतिरिक्त शहर अभियंता (पाणीपुरवठा विभाग), नमुंमपा

सिडको उपनगरांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने उपलब्ध पाणीसाठ्यानुसार नागरिकांना पाणी दिले जात आहे. ज्या परिसरात पाणी कमी पडत आहे, तेथे सिडकोकडून तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. दरम्यान, मोरबे धरणाची पाणीपातळी वाढली आहे. पूर्वीप्रमाणे ५७ एमएलडी पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला जात आहे. हा मुद्दा वरिष्ठ पातळीवरही मांडण्यात आला असून, सिडकोचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. – डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडळ