पनवेल : पनवेलकरांना सध्या पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा होत नसताना त्यात आणखी कपात करण्याऐवजी आधी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून नागरिकांना पुरेसे पाणी द्या, अशा शब्दांत आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर नितीन पाटील यांनी महापालिका प्रशासनाला सुनावले. पाणीपुरवठ्यात आणखी १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी पर्यायी जलस्रोतांचा वापर आणि सुरू असलेल्या जलप्रकल्पांची कामे यांना प्राधान्य देण्याच्या सूचना सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आल्या.

पनवेल महापालिकेच्या मुख्यालयात आयोजित या बैठकीत न्हावाशेवा टप्पा तीन जलप्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच महापालिका क्षेत्रातील लहान धरणे, तलाव, विहिरी आणि बोअरवेल यांमधील उपलब्ध पाण्याचा पिण्यासाठी वापर करता येईल का, याची चाचपणी करण्याचे निर्देश देण्यात आले. या जलस्रोतांचा वापर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास करून तातडीने अहवाल सादर करण्यास प्रशासनाला सांगण्यात आले.

बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, विविध विभागांचे अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

पनवेल महापालिकेने यापूर्वीच अंशतः पाणीकपात लागू केली आहे. त्यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या आणि इमारतींमधील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, नगरसेवकांकडे तक्रारी येत आहेत. त्यात आणखी १५ टक्के कपात केल्यास आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र अगोदर ८० टक्के तरी पाणीपुरवठा व्यवस्थित दिल्यास आणि प्रत्येक क्षेत्रनिहाय पाणीपुरवठ्याचे नियोजन केल्यानंतर १५ टक्के पाणीकपातीचे वेळापत्रकाचे नियोजन करावे अशा सूचना या बैठकीत महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या. तसेच दिवाळीच्या काळात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे. सोमवारच्या बैठकीत अतिरिक्त पाणीकपातीचा निर्णय अपेक्षित होता. मात्र, हा निर्णय तूर्तास दिवाळीनंतर घेतला जाण्याची शक्यता आहे.

पनवेल शहराला आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणातून दररोज १६ दशलक्ष लिटर (एमएलडी), महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून १७ एमएलडी, तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) दोन ते तीन एमएलडी पाणी मिळते. राज्य सरकारने एल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सिडको आणि नवी मुंबई महापालिकेने पाणीकपातीचे नियोजन सुरू केले आहे. सिडकोच्या काही नोडमध्ये आठवड्यातून एक दिवस २४ तास पाणीपुरवठा बंद, तर काही नोडमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था सोमवारपासून लागू करण्यात आली आहे.

ओवे धरण, तळोजा मजकूर आणि पिसार्वे येथील तलावांच्या परिसरात निवासी वस्ती नसल्याने या तलावांतील पाण्याचे शुद्धीकरण करून ते पिण्यासाठी वापरण्याच्या शक्यतेची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी संबंधित जलक्षेत्र महापालिकेच्या ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे. विहिरी आणि बोअरवेल यांचीही पडताळणी करून त्यातील पाण्याचा वापर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा पुढील १५ दिवसांत तयार करण्यास प्रशासनाला सांगितले आहे. – नितीन पाटील, महापौर, पनवेल महापालिका