पनवेल : वावेघर ग्रामपंचायतीच्या कारभाराची पडताळणी करताना खरेदी आणि विकासकामांच्या खर्चात अनेक अनियमितता आढळल्याने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावली त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीच्या कारभारातून दूर केले. गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशीत साहित्य खरेदीसाठी बाजारभावापेक्षा अधिक दर आकारल्याचे, काही कामांसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया न राबवल्याचे आणि खर्चाच्या नोंदींसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे पडताळणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र चौकशी अहवाल मार्च २०२५ पर्यंतच्या कालावधीत केला. जागरूक ग्रामस्थांनी त्यापुढील महिन्यांमध्ये ग्रामसेवक व त्यांच्या साथीदारांनी केलेल्या कारभारामध्ये पाणी शुद्ध करण्याची ब्लिचिंग पावडर ५०० रूपये प्रति किलोदराने, एक चहा आणि समोशा या नाश्त्यासाठी ५६५ रूपयांचा दर लावला एवढ्यावरच भ्रष्टाचार थांबला नाही तर गावातील जी घंटागाडी जुलै २०२५ मध्ये घेतली त्याच महिन्यात त्याच्या दुरूस्तीसाठी ५० हजार रूपयांचे देयक काढले. या कारभारासाठी स्वतंत्र चौकशीची मागणी जागरूक ग्रामस्थाकडून केली जात आहे.
वावेघर गावाची लोकसंख्या साडेपाच हजार आहे. याच गावातील सामाजिक कार्यकर्ते सूजीत माळी आणि ग्रामस्थांनी एकत्रित पणे या भ्रष्टाचाराला वाचा फोडली. त्यानंतर शेकापचे रायगड जिल्हाध्यक्ष अनिल ढवळे यांनी सुद्धा याबाबत रायगड जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. रायगड जिल्हापरिषदेच्या अध्यक्षांकडून आलेल्या निर्देशांनंतर वावेघर ग्रामपंचायतीच्या २०२३-२४ ते मार्च २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीतील कामांची तपासणी करण्यात आली. परंतू मार्च २०२५ ते ऑगस्ट २०२६ अशा १७ महिन्यांच्या कारभारात अजून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थ सुजीत यांनी केला आहे. पनवेल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि शाखा अभियंता यांच्या संयुक्त पथकाने ग्रामपंचायतीच्या नोंदी व खर्चाची पडताळणी केली. त्यानंतर अनियमिततांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सुपुर्द केला.
या अहवालामध्ये गंभीर बाबी समोर आल्या आहेत. अहवालात नमुद केल्याप्रमाणे विविध विकासकामे, जलवाहिनी दुरुस्ती, गटार बांधकाम, शौचालये, आरोग्याची मेडिक्लोर व कार्बोनिक पावडर यांच्यासारख्या साहित्य खरेदी आणि कर्मचारी वेतन यांसारख्या बाबींवरील खर्चाच्या नोंदींमध्ये त्रुटी आढळल्या. काही कामांसाठी अंदाजपत्रक व मूल्यांकन उपलब्ध नसल्याचे, निविदा प्रक्रिया राबवली नसल्याचे, तसेच काम पूर्ण झाल्याचे दर्शवणारी आवश्यक कागदपत्रे किंवा देयके नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही खरेदींच्या दरांची बाजारभावाशी तुलना केली असता दर अधिक असल्याचेही पडताळणीत पुढे आले.
ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीच्या व्यवहारांमध्येही त्रुटी आढळल्या. काही खर्चांसाठी देयके (बिल) किंवा दरपत्रक (कोटेशन) उपलब्ध नसल्याचे, तर काही नोंदींच्या आवश्यक कागदपत्रे नसल्याचे अहवालात नमूद आहे. त्यामुळे खर्चाची पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या अनियमिततेचा पर्दाफास झाल्यानंतर रायगडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी ग्रामसेवक निवृत्ती आंधळे याला निलंबित केले आहे. मात्र अजूनही संबंधित प्रकरणातील रकमेची वसुली व या भ्रष्टाचारात साथ देणा-या इतरांची चौकशी झाली नाही. या प्रकरणाला वाचा फोडणा-या सुजीत माळी यांनी एप्रिल २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील कारभाराची चौकशीची मागणी केली आहे. त्यावर अद्याप मुख्य कार्यकारी अधिका-यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. ग्रामपंचायतीमध्ये सरपंचावर सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही.
वावेघर गावाच्या कारभाराची चौकशी पंचायत समिती स्तरावर केल्यानंतर या चौकशी अहवालातून ही अनियमितता नसून हा अपहार आहे. ग्रामपंचायत ही कोणत्या एक व दोन व्यक्तींची किंवा त्या पंचायतीच्या पदाधिका-यांची खासगी मालमत्ता नसून स्थानिक स्वराज्य संस्था आहे. गैरव्यवहार आढळल्याने दोषींवर कठोर कारवाई झाली पाहीजे. भ्रष्टाचार जेवढ्या रकमेचा आहे तेवढी रक्कम संबंधित दोषी व्यक्तींकडून शासनाने वसुल करणे गरजेचे आहे. जेणेकरून इतर ग्रामपंचायतींमध्ये असे गैरप्रकार घडणार नाहीत – अनिल ढवळे, जिल्हाध्यक्ष, शेकाप
शासनाच्या अॅपवर आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या नावावर नोंदवलेल्या विकासकामांची माहिती पाहील्यावर आमचेही डोळे चक्रावले. यामध्ये विविध विकासकामांवर लाखो रूपयांचा खर्च झाल्याचे समजले. त्यानंतर आम्ही चौकशी सुरू केली. २ लाखांचा लॅपटॉप प्रत्यक्ष योजनेत दाखवला होता. मात्र प्रत्यक्षात गावात लॅपटॉप आलाच नाही. एक कचरापेटी एक लाख रूपयांना खरेदी केल्याचे दाखविण्यात आले. जलवाहिनीच्या दुरूस्तीची चार वेगवेगळी कामे दाखविण्यात आली. मात्र त्यांच्या दिलेल्या बिलांची रक्कम सारखीच. सर्व कामांसाठी १ लाख ६८ हजारांची बिले अदा केली होती. सर्वच कामांची रक्कम समान दाखवून बिले काढण्यात आल्याचे उघड झाले. मासिक सभेत पथदिवे व इतर बाबींची विचारणा केल्यावर सहाशे बल्ब लावले, पण हे कुठे लावले याचा हिशोब मागीतला. इतर वस्तू एवढ्या चढ्या भावाने का घेतल्या याचाही हिशेब मागीतला. गोंधळलेल्या ग्रामप्रशासनाने १० टक्के रक्कम वाटावी लागत असल्याचे पहिले सांगीतले. त्यानंतर याबाबत पंचायत समिती व जिल्हापरिषदेकडे दाद मागीतली. चौकशी ही फक्त मार्च २०२५ पर्यंत झाली आहे. मात्र आमची मूळ मागणी एप्रिल २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील कारभाराची सुद्धा चौकशी करण्याची मागणी आम्ही केली आहे. एक चहा आणि सामोसा पाचशे रूपये ते दूकानाचा शोध घेतला पण खोपोलीत ते दुकानच आम्हाला सापडले नाही. ब्लिचिंग पावडर ही अमलीपदार्थाएवढी महाग का खरेदी केली. याबाबत उत्तर सरकारी व्यवस्थेने दिले पाहीजे. ज्यांनी या रकमेचा भ्रष्टाचार केलाय त्यांना शासन करून त्यांच्याकडून ही रक्कम तातडीने वसुल केली पाहीजे. – सुजित माळी, जागरूक ग्रामस्थ
