शहरांतर्गत सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या अभावाकडे बोट; महापालिकेच्या २०२०-२१च्या पर्यावरण अहवालातील निष्कर्ष

संतोष सावंत

पनवेल : रेल्वे स्थानकापासून वसाहती दूर आणि पालिकेची स्वत:ची परिवहन व्यवस्था नसल्याने पनवेलकरांना स्वत:च्या मालकीच्या वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. पालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या पर्यावरणविषयक अहवालात ही बाब अधोरेखित करण्यात आली असून यात ६८ टक्के पनवेलकरांना स्वत:च्या वाहनातून प्रवास करावा लागतो. यामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण ७५ टक्क्य़ांहून अधिक आहे.

पनवेल पालिकेने नुकताच पर्यावरण अहवाल मांडला असून त्याची प्रत खुली करण्यात आली आहे. यात पर्यावरणासह पनवेलमधील आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणही मांडण्यात आले असून यातून शहराच्या विकासाची दिशा ठरविण्यासाठी पालिका प्रशासनाला मदत होणार आहे. या अहवालातील शहराच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली आहे. यात शहराची रचना परिवहन व्यवस्था कशी सक्षम नाही हे दिसून येते. 

केंद्र सरकार एकीकडे सार्वजनिक परिवहन वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत आहे, मात्र गेली पाच वर्षे पनवेल महापालिका प्रशासनाने आपले परिवहन धोरण आखल्याचे ऐकिवात नाही. पनवेलमधून मुंबई, ठाण्यात जाण्यासाठी व बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वे स्थानक आहे, तर सिडकोने उभारलेल्या वसाहती एका ठिकाणी, तर रेल्वे स्थानक दुसऱ्या टोकाला आहे. नोकरदारांना पायी प्रवास शक्य नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक गाठण्यासाठी प्रवाशांना दुचाकी व चारचाकी वाहनांचा पर्याय निवडावा लागतो. त्यात रेल्वे स्थानक ते घरापर्यंत जाण्यासाठी पालिकेची स्वत:ची परिवहन व्यवस्था नाही. नवी मुंबई महापालिकेच्या बसेस पनवेलमध्ये सेवा देतात, मात्र त्या मोजक्याच मार्गावर. त्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी रिक्षांचा वापर करावा लागतो. मात्र मनमानी भाडेआकारणीमुळे ते परवडत नाही. त्यामुळे शहरांतर्गत प्रवासासाठी स्वत:चे वाहन घेणे पनवेलकरांना भाग पडत आहे.

पर्यावरण अहवालात दिलेल्या माहितीनुसार लोकसंख्येच्या ६८.१ टक्के नागरिकांकडे स्वत:चे वाहन आहे. यापैकी जवळपास ७५ टक्के नागरिकांना शहरांतर्गत प्रवासासाठी स्वत:चे वाहन वापरावे लागते. कामावर जाण्यासाठी स्वत:चे वाहन वापरणाऱ्यांचे प्रमाण ४८.६ टक्के आहे. स्वत:चे वाहन नसलेल्यांपैकी बहुतांश नागरिकांकडे रिक्षाखेरीज सार्वजनिक वाहतुकीचा दुसरा पर्याय नाही. पनवेलमध्ये एसटी बस स्थानक असून यातून दररोज ७५ बसेसची सेवा दिली जात असून ७३ मार्गिकांवर दिवसाला २४,५७७ प्रवाशांची वाहतूक करतात. रेल्वेने मुंबई व उपनगरांत प्रवास करणाऱ्यांची संख्या ही २७.२ टक्के इतकी आहे.  महापालिका प्रशासनाने शहराचा परिवहन आराखडा बनवून वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याकडे हा पर्यावरण अहवाल बोट दाखवत आहे. 

पार्किंगची गंभीर समस्या

शहरात वाहनांचे प्रमाण अधिक असल्याने वाहने उभी करायची कुठे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेची वाहनतळ व्यवस्था नसल्याने शहरात रस्त्यावर जागा मिळेल तिथे वाहने उभी केली जात आहेत. परिणामी रस्ते अरुंद, त्यात वाहने उभी राहल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. वाहनांची संख्या अशीच वाढत राहिल्यास पाण्यापेक्षा हा प्रश्न गंभीर होणार असून वाहने उभी करायची कुठे, असा नवा प्रश्न उभा राहणार आहे.

पावणेतीन वर्षांत पावणेदोन लाख वाहनांची भर

गेल्या साडेतीन वर्षांत १ लाख ७२ हजार ४६३ वाहनांची खरेदी झाल्याची नोंद पनवेल प्रादेशिक कार्यालयात झाली आहे. यात यात पनवेल विभागात सर्वाधिक नव्या वाहनांची नोंद झाली आहे. पनवेलमध्ये २०१८-२०१९ मध्ये  ६३ हजार ८९१, २०१९-२०२० मध्ये ५२ हजार ६८६, तर २०२०-२०२१ मध्ये ३६,७९१, तर एप्रिल २०२१ ते ऑक्टोबपर्यंत १९ हजार ०९५ नवीन वाहन खरेदीची नोंद परिवहनकडे आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या दुचाकी व चारचाकी वाहनांची आहे.