पनवेल : गेले काही महिने दिवसाआड मिळणारे पाणी जून महिना संपत आला तरी कायम असल्याने पनवेलकर त्रस्त आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणात उपसा करण्याइतपत पाणीसाठा नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी पनवेलमध्ये जून महिन्यात सरासरी २३ जूनपर्यंत ८५० मिलिमीटर पाऊस पडला होता. तर या वर्षी फक्त १०३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हवामान विभागाकडे नोंदविली गेली आहे. त्यामुळे पावसाने मोठी ओढ दिल्याचे दिसत आहे.

पावसाने ओढ दिल्याने पनवेलमध्ये पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होत चालला आहे. गेले काही महिने दिवसाआड पाण्यावर आपली तहान भागवणाऱ्या पनवेलकरांना आणखी काही दिवस पाण्यासाठी काटकसर व पदरमोड करावी लागणार आहे. पिण्यासाठी विकतचे बाटली बंद पाणी घ्यावे लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

गेल्या आठवड्यापासून पावसाला काही प्रमाणात सुरुवात झाली मात्र तुरळक पाऊस पडत आहे. त्यामुळे देहरंग धरणाची पाणी पातळी २ फुटाने वाढ झाली. मात्र हा पाणीपुरवठा पनवेल शहराला होईल अशा वाहिनीपर्यंत पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे एमजेपी व एमआयडीसीकडून पाण्याची उसनवारी करीत सध्या पनवेलकरांची तहान भागविली जात आहे.

पनवेलकरांसह पालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी व पाणीपुरवठा विभाग धरणक्षेत्राची पाणीपातळी कधी वाढेल आणि पाणीपुरवठा कधी सुरळीत होईल या प्रतीक्षेत आहे.

पनवेलकरांना सुमारे १५ दशलक्षलिटर पाण्याची गरज आहे. सोमवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पालिकेला पाण्याची समस्या मिटविण्यासाठी सल्ला दिला.

नगरसेवक म्हात्रे यांच्या सल्ल्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील उन्हई धरण ते पनवेल हे अंतर शंभर किलोमीटर आहे. या धरणातील २५०० दशलक्षलिटर पाणीसाठा टाटा कंपनी कुंडलिका नदीमध्ये सोडते. कुंडलिका नदीमधून हे पाणी थेट समुद्राकडे जाण्याऐवजी पनवेलकडे आणण्याचा प्रस्ताव प्रशासनाने हाती घेतल्यासपनवेलकरांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. यासाठी शासनाला ६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती नगरसेवक म्हात्रे यांनी सभागृहाला दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvels water proble serious rains citizens suffer due to water during the day
First published on: 24-06-2022 at 00:01 IST